Join us   

पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण झाली? जेवणानंतर चुकूनही करु नका २ गोष्टी, नाहीतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 1:53 PM

Never Do 2 Mistakes After Meal : पचनशक्तीवर ताण येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी आयुर्वेदात सांगतात..

पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती काहीशी क्षीण झालेली असते. थंड हवेमुळे आपल्याला खूप भूक लागली असे आपल्याला वाटते खरे. पण प्रत्यक्ष खायला घेतल्यावर मात्र आपल्याला नेहमीसारखे खायला जात नाही. इतकेच नाही तर एरवी आपल्याला साधारण ४ ते ५ तास झाले की भूक लागते. मात्र पावसाळ्यात काही जणांना अशी भूक लागतच नाही. उलट विनाकारण पोट भरल्यासारखे, डब्ब झाल्यासारखे वाटणे, ढेकर येणे अशा समस्या उद्भवतात. हवेतील बदलांमुळे शरीरात हे सगळे बदल होत असतात. हे जरी ठिक असले तरी जेवणानंतर २ गोष्टी करण्याची चूक कधीच करु नये. नाहीतर त्यामुळे ही पचनशक्ती आणखी क्षीण होते आणि मग एकूण पचनक्रियेवर त्याचा परीणाम होत राहतो. पाहूयात या २ गोष्टी कोणत्या आणि त्याचा नेमका आरोग्यावर काय परीणाम होतो (Never Do 2 Mistakes After Meal). 

१. जेवण झाल्यावर किंवा ब्रेकफास्टनंतर आंघोळ

अनेकांना ब्रेकफास्ट करुन झाल्यावर घरातून अगदी बाहेर पडताना आंघोळ केलेली आवडते. म्हणजे नंतर कपड्यांना अन्नपदार्थांचे वास येत नाहीत. महिलांच्या बाबतीत तर बरेचदा सकाळची कामं करता करता ब्रेकफास्ट केला जातो. त्यामुळे सगळं आवरलं की शेवटी ऑफीसला बाहेर पडतानाच आंघोळ केली जाते. मात्र असे करणे योग्य नाही कारण खाल्ल्यानंतर शरीराला त्या अन्नावर काम करण्यासाठी रक्त आणि ऊर्जेची आवश्यकता असते. पण अशावेळी आपण एकदम आंघोळ केली तरी रक्तप्रवाह विस्कळीत होतो. हा रक्तप्रवाह त्वचेचे तापमान योग्य राखण्यासाठी त्वचेच्या दिशेने होतो आणि त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने पचनक्रिया खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवण किंवा नाश्ता आणि आंघोळ यांच्यामधे किमान २ तासांचा कालावधी जायला हवा. 

२. जेवण झाल्यावर व्यायाम करणे 

जेवण झाल्यावर शतपावली करायची असते हे खरे असले तरी त्याचा वेग आणि वेळ हा मर्यादित असायला हवा. काही जण सकाळी किंवा संध्याकाळी पोटभर खाऊन मग व्यायामाला जातात. असे करणे चुकीचे आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्यायाम करताना पोटाला एकप्रकारचा ताण पडतो. खाल्ल्यानंतर अन्न नैसर्गिकपणे अन्ननलिकेतून पुढील प्रक्रियेसाठी पोटाकडे पाठवले जाते असते. पण याचवेळी पोटाची जोरजोरात हालचाल होत असेल तर त्यामुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराचा सगळा फोर्स पायाच्या बाजुला जातो आणि मग रक्तप्रवाहही तिकडेच जातो. पण जेवण झाल्यावर पोटातील क्रिया सुरू असल्याने रक्तप्रवाह तिथे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे जेवणानंतर व्यायाम करु नये.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलपावसाळा आणि पावसाळी आजारपण