डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
जुनं वर्ष सरतं तसं आपण गेल्या वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं याचे हिशोब मांडतो. नवीन वर्षात आपल्याला काय करायचं याचे प्लॅनिंग करतो. महिलांच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना अनेकदा कुटुंब, मुलं, घरातील इतर गोष्टी यांनाच प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. मात्र यामध्ये व्यक्ती म्हणून आपण स्वत:कडेही थोडं लक्ष द्यायला हवं हे आपल्या नकळत मागे पडते. पण नवीन वर्षात आपण स्वत:कडेही थोडं लक्ष देऊया का? फार अवघड नाही अगदी सोप्या दोन-तीन गोष्टी केल्या तरी आपलं आरोग्य सुधारेल..
एकीकडे आपली नोकरी, करिअरचा ताण, घरकाम, वडिलधाऱ्या पिढीचे म्हातारपण पण सांभाळायचे आहे आणि मुलांचेही बघायचे आहे. बैठी जीवनशैली, ताण, वाढती स्पर्धा, जंक फूड यांसारख्या गोष्टींमुळे वाढलेले वजन, नियंत्रणाबाहेर गेलेला मधुमेह, सतत चढत जाणारा रक्तदाब, एक एक सांधा गाठणारा संधिवात हे शत्रू या पिढीचं जगणं अशक्य करू शकतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. स्त्रियांनी पाळीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष देऊन उपचार घेणे गरजेचे आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्त्रियांनी स्वत:ची नियमित तपासणी केली तर पुढचे खूप त्रास वाचवू शकतात.
येत्या वर्षात आरोग्यासाठी ४ गोष्टींकडे आवर्जून लक्ष देऊया...
१. रोज नियमित चाळीस मिनिटे व्यायाम.
२. जेवणात साखर, बटाटा, मैदा, भात, तेल, मीठ कमी.
३. वयानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या.
४. कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करणे.
हे कसं जमेल?
प्रत्येक स्त्रीच्या मनात खुलून दिसण्याची इच्छा असतेच पण संसाराच्या अथक रगाड्यात ती कुठतरी मिटून ,हरवून जाते. घरातल्या सगळ्यांच्या गरजांना सांभाळता सांभाळता स्वत:च्या शरीराकडे स्त्रिया अक्षम्य दुर्लक्ष करतात. लग्नाच्या आधी नीटनेटकी, रसरशीत दिसणारी युवती लग्नानंतर थोड्याच वर्षात गबाळी, आत्मविश्वास गमावलेली दिसू लागते. आपल्यातल्या पूर्वीच्या या युवतीला परत आणूया या नववर्षात. हे खूप अवघड नाहीये.
१. रोज थोडासा व्यायाम केला तरी शरीराला उत्तम डौल प्राप्त होऊ शकतो.
२. मॉईश्चरायजर लावल्याने त्वचेचा तजेलदारपणा परत येऊ शकतो.
३. थोडीशी बदललेली हेअर स्टाइल, योग्य शाम्पू, कंडीशनर तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवून टाकतात.
४. आपल्या व्यक्तिमत्त्वाला कोणते रंग, कपडे छान दिसतील यावर थोडा शोध घेणं अजिबात अवघड नाही.
५. आणि सर्वात महत्त्वाचं...ओठावरचं कायमचं स्मितहास्य..
मग करूया हे संकल्प या नव्या वर्षात?
(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ आहेत)
shilpachitnisjoshi@gmail.com