न्यू इयर पार्टी, त्यातही शनिवार-रविवार अनेकांचे स्पेशल सेलिब्रेशन प्लॅन असतातच. हल्ली पार्टी म्हंटली की अनेकजण/अनेकजणी ड्रिंक्स घेतात. अल्कोहोलशिवाय सेलिब्रेशन होत नाही असं नाही पण ज्याची त्याची साजरं करण्याची रीत असते. पुरुषांसह महिलाही मद्यपान करतात, त्यातले सांस्कृतिक-नैतिक संदर्भ हा ज्याचा त्याचा विचार झाला मात्र आपले आरोग्य आणि तब्येत मात्र याकाळातही सांभाळायला हवेच.
अतीमद्यपान, त्यातून तब्येतीवर होणारे परिणाम, ड्रिंक ॲण्ड ड्राइव्हचे धोके, बेभान होऊन संकटांना आमंत्रण हे सारे मात्र नक्कीच टाळता येईल. हँग ओव्हरच्या पलिकडे स्वत:ची आणि तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. त्यातही पिअर प्रेशर, केवळ मित्रमैत्रिणींच्या दबावाला बळी पडून पहिल्यांदाच अती ड्रिंक करणाऱ्यांनीही खबरदारी घ्यायला हवी. आपली काळजी आपण घ्यायची हे यासाऱ्यात विसरु नयेच.
हँगओव्हर आहे हे कसं ओळखाल?
डोकेदुखी, वारंवार तहान लागणे, थकवा, डोळे लाल होणे, सुस्ती, यासोबतच चक्कर येणे, मूड बदलणे ही हँगओव्हरची लक्षणे आहेत.
टाळता कसे येईल?
एकतर कुणी कितीही आग्रह केला तरी आपल्यावर आपले नियंत्रण हवेच. मद्यपान करण्यापूर्वी काहीही न खाल्ल्याने देखील हँगओव्हर होऊ शकतो. चांगला आणि संतुलित आहार घेतला असेल, तर नशा तितकीशी त्रासदायक ठरत नाही.
हँगओव्हरवर उपाय
नारळ पाणी प्या
हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरेल. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात.
लिंबूपाणी प्या
हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरेल. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून प्या. याने हँगओव्हर लवकर उतरेल.
मध, दही, पुदिना
शरीरात अल्कोहोलचे प्रमाण वाढले असेल तर दह्याचे सेवन फायदेशीर ठरेल. फक्त लक्षात ठेवा की दही साखर किंवा मीठ न घालता खावे.
३-४ पुदिन्याची पाने गरम पाण्यात मिसळून प्यायल्याने बरे वाटेल. मधही पाण्यातून घेता येईल.
मात्र नंतर त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा वेळेत स्वत:ला सावरणं उत्तम.