डायबिटीस ही गेल्या काही वर्षातील महत्त्वाची आरोग्य समस्या असून त्यामुळे उद्भवणाऱ्या तक्रारींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. डायबिटीस हा कोणत्याही वयात, कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. या आजाराचा सामना करणे आणि त्याच्यासोबत स्वत:ची काळजी घेणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास यालाही गेल्या १८ वर्षांपासून टाइप १ डायबिटीस आहे. नुकतेच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या या आजाराबाबत जाहीरपणे भाष्य केले असून या आजाराबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे निकचे म्हणणे आहे. डायबिटीसमुळे सतत लघवी लागणे, तहान लागणे आणि दमल्यासारखे होणे तसेच वजन वेगाने कमी होणे अशा समस्या उद्भवत असल्याचे निकने सांगितले.
माझ्या आजुबाजूला असणाऱ्यांच्या म्हणजेच आईवडीलांच्या सपोर्टमुळे मला ही डायबिटीसची लक्षणे आहेत हे वेळीच लक्षात आले. त्यामुळे मी वेळेवर तपासण्या केल्याने माझे आयुष्य वाचले. या डायबिटीसबाबत सुरू असलेल्या एका मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही निकने यावेळी केले. मालती मेरी या आपल्या मुलीचे एक नवीन वडिल म्हणून आता मला तिच्याकडेही या लक्षणांबाबत बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे असेही निक म्हणाला. मी लहान असताना माझे आईवडीलही माझ्याकडे अतिशय बारकाईने लक्ष ठेवायचे, त्यामुळे माझा जीव वाचू शकला. त्याचप्रमाणे आता मला मुलीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. माझ्याप्रमाणे आणखी कोणाला ही चार लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी असेही निक सांगतो. यामुळे प्रियांकाही निकच्या आरोग्याची विशेष काळजी घेत असल्याचे दिसते.
काय असतो टाइप १ डायबिटीस?
सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेन्शनुसार आपण जे खातो, त्या पदार्थांचं सखारेत विभाजन होतं आणि साखर रक्तात मिसळते. जेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण वाढायला लागतं तसं स्वादुपिंडातून इन्शुलिन हार्मोन स्त्रवण्याचा इशारा मिळतो. इन्शुलिनद्वारे रक्तातील ग्लुकोज वापरायला गती मिळते, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पण जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा मात्र इन्शुलिनची निर्मिती कमी होते किंवा शरीर इन्शुलिनबाबत असंवेदनशील होतं.डायबिटीसचे चार प्रकार आहेत, त्यातला टाइप 1 डायबिटीसमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून इन्शुलिनची निर्मिती करणार्या स्वादुपिंडातील पेशी नष्ट करायला लागते. यामुळे इन्शुलिनचं प्रमाण फारच कमी होतं. साधरणत: हा आजार लहानपणी आणि किशोरावस्थेत आढळतो. म्हणूनच याला जुवेनाइल डायबिटीस किंवा इन्शुलिन डिपेंडण्ट डायबिटीस असंही म्हणतात.
वयाच्या 6 ते 18 वर्षांच्या मुलांमधे ही समस्या प्रामुख्याने आढळते.टाइप 1 डायबिटीसकडे लक्ष दिलं नाही, योग्य ती काळजी घेऊन त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर मग पुढे हदयविकाराचा झटका, कमी दिसणं, रक्तवाहिन्यांची हानी होणं, गंभीर प्रकारचे संसर्ग होणं, किडन्या निकामी होणं आणि वजन वाढणं यासारखे गंभीर आजार किंवा परिणाम होवू शकतात. मधुमेहासंबंधीच्या ए1सी टेस्ट, फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट, ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट, रॅंडम ब्लड शुगर टेस्ट या चाचण्या करुन डायबिटीसचं, डायबिटीसच्या प्रकाराचं निदान होवून त्यांचं गांभिर्यही या चाचण्यांद्वारे तपासलं जातं. जर ब्लड शुगर रिपोर्टमधील आकडे गंभीर असतील तर इन्शुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. पण जर समस्या गंभीर नसेल तर मात्र जीवनशैलीत बदल करुनही टाइप 1 डायबिटीस नियंत्रणात येतो.
टाइप 1 डायबिटीसची लक्षणं काय?
1. खूप तहान लागणं.
2. सारखं लघवी लागणं.
3. थकवा वाटणं, सुस्ती येणं.
4. त्वचेवर झालेल्या जखमा पटकन भरुन न येणं.
5. सारखी भूक लागणं.
6. अंगाला खाज येणं.
7. त्वचेला संसर्गजन्य आजार होणं.
8. अस्पष्ट दिसणं.
9. कारण नसताना वजन कमी होणं.
10. सतत मूड बदलत राहाणं.
11. डोकं दुखणं आणि चक्कर येणं.
12. पायाच्या स्नायुंमधे पेटके येणं, वेदना होणं.