आपल्या प्रत्येकाच्या झोपायच्या वेगवेगळ्या सवयी असतात. कोणाला एकटं झोपायला आवडतं तर कोणाली शेजारी कोणी असल्याशिवाय झोप येत नाही. कोणाला झोपताना पांघरुण लागते तर कोणाला डोळ्यावर रुमाल लागतो. साधारणपणे आपण रात्री अंधार करुन झोपतो. पण काहींना अंधारात झोप येत नाही, त्यांना झोपतानाही एखादा तरी दिवा आणि उजेड लागतोच. आता डोळे मिटून झोपायचे असताना या लोकांना आजुबाजूला प्रकाश का लागतो, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर कदाचित सुरक्षित वाटावे यासाठी किंवा रात्री उठल्यावर एकदम अंधार नको म्हणून हे लोक लाइट लावून झोपतात. पण अशाप्रकारे लाईट लावून झोपणे आरोग्यासाठी घातक असल्याचे समोर आले आहे. लाइटमध्ये झोपणाऱ्यांना लठ्ठपणा, डायबिटीस, ब्लडप्रेशर यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शिकागोमधील एका विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार आरोग्याचे प्रश्न आणि रात्री झोपताना सुरू असणारा लाइट यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते सांगितले आहे. हा अभ्यास करताना अभ्यासकांनी ६३ ते ८४ वयोगटातील ५५२ जणांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये वयाने जास्त असाऱ्यांच्या शरीरावर रात्री दिवा लावून झोपण्याचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून येते. या दिव्यामुळे हायपरटेन्शन, लठ्ठपणा, वाढलेली शुगर यांसारख्या समस्या वाढत असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. शरीरात असणारे झोपेचे घड्याळ बदलण्याचे काम रात्रीच्या लाईटमुळे केले जाते. झोपेची आणि झोप पूर्ण झाल्यावर उठण्याची आपल्या शरीराची जैविक यंत्रणा बदलण्याचे तसेच झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता बदलवण्याचे कामही या लाईटद्वारे केले जाते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आपण पूर्णपणे अंधारात झोपतो त्यावेळी शरीर मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती करते. विविध आजारांचा सामना करण्यासाठी हे हार्मोन गरजेचे असून त्यामुळे ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्यापासूनही आपल्याला सुरक्षा मिळू शकते. पूर्ण अंधार असेल तर आपल्याला लवकर आणि शांत झोप लागण्यास मदत होते. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या कमी होतात तसेच वेगवेगळ्या कारणांनी येणारे नैराश्यही दूर होण्यास खोलीत अंधार असण्याचा उपयोग होतो. तसेच पूर्ण अंधारात झोपल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि त्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण तुम्हाला लाईटशिवाय झोपायची अजिबात सवय नसेल तर लाईट एकदम डीम ठेवावेत. तसेच हे लाईट फिकट रंगाचे असतील असे पाहावे. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स तर वाटेलच पण झोपण्याचे वातावरण तयार व्हायला याची चांगली मदत होईल.