रात्रीची झोप कशी गाढ आणि शांत लागायला हवी. झोप छान झाली की पुढचा दिवस मस्त फ्रेश जातो. पण नीट झोपच झाली नाही की मात्र दिवसाचं सगळं गणित बिघडून जातं. दिवसभर घरातली, बाहेरची, ऑफीसची सगळी कामं करुन जीव पार थकून गेलेला असतो. रात्री कधी एकदा आवरुन पडतोय असं झालेलं असतं आणि पाठ टेकली की मात्र काही केल्या झोप येत नाही. मग या कुशीवरुन त्या कुशीवर अशा झोपायच्या पोझिशन बदलल्या जातात. कितीतरी तास असे करुनही झोप लागत नाही. उशीरा कधी लागलीच तर मग उगाचच ती मोडते. मग पुन्हा लवकर झोप येत नाही. पहाटे कधीतरी डोळा लागतो आणि मग उठायची वेळ होते. कामं तर समोर मांडून ठेवलेलीच असतात. उत्तम आरोग्यासाठी ६ ते ८ तासांच्या झोपेची आवश्यकता असते. मग ती मिळाली नाही की आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी निर्माण होतात आणि सगळे चक्र पार बिघडून जाते. पण काही उपाय केल्यास ही समस्या सहज दूर होऊ शकते. पडल्या पडल्या शांत आणि गाढ झोप लागायची असेल तर हे उपाय नक्की करुन पाहा...
१. झोपण्यापूर्वी मालिश करा
दिवसभराच्या थकव्याने शरीराला ज्याठिकाणी ताण पडला आहे त्याठिकाणी तेलाने हळूवार मालिश करा. संपूर्ण अंगाला मालिश केले तर उत्तमच. पण ते शक्य नसेल तर किमान ज्याठिकाणी ताण आल्यासारखे वाटत आहे त्याठिकाणी आवर्जून मालिश करा. हे मालिश कोमट तेलाने केल्यास आणखी उत्तम. डोक्याला आणि खांद्यांना कोमट केलेले तीळाचे तेल रात्री झोपताना आवर्जून लावा. त्यामुळे तुमचा थकवा काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल आणि शांत झोप लागेल.
२. झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा
पूर्वीच्या काळी झओपण्यापूर्वी पाय धुवून झोपायची पद्धत होती. त्याला शास्त्रीय कारण होते. पाय धुतल्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी आलेली नकारात्मकता दूर होते आणि तुम्हाला नकळत फ्रेश वाटते. मुख्यत: पाय धुतल्याने शरीराला आणि ताण आलेल्या पेशींना आराम मिळायला मदत होईल. हे पाय तुम्ही कोमट पाण्याने धुतले तर आणखी चांगले. धुतल्यानंतर त्यांना नीट कोरडे करुन झोपताना थोडेसे तेल घेऊन तळव्यांना मालिश करा. तुमच्याच हाताने पायाची बोटे, तळवे, टाचा छान हळूवार चोळा. त्यामुळे पायाचा शीण निघून जाईल आणि तुम्हाला गाढ झोप लागायला मदत होईल.
३. प्राणायाम करा
दिवसभर आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी धावत असतो. घड्याळाच्या काट्यावर आपला दिवस पुढे सरकत असतो. यामध्ये शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. पण मन आणि शरीराला थोड्या शांतीची, विश्रांतीची गरज असते. प्राणायाम केल्याने मन आणि शरीर शांत व्हायला मदत होते. डोळे मिटून शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे डोके शांत होऊन चांगली झोप येण्यास मदत होईल.
४. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा
रात्री सगळी कामे आवरुन बेडवर पडल्यानंतर अनेकांना टीव्ही पाहणे, मोबाईल किंवा टॅबलेट पाहणे याची सवय असते. अनेकदा तासनतास सोशल मीडियाचा वापर केला जातो तर कधी चित्रपट नाहीतर वेबसिरीज पाहत बसल्यामुळे आलेली झोप निघून जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहाणे केव्हाही चांगले. असे केल्यास शांत आणि गाढ झोप येऊ शकते.