सांधेदुखी असे नुसते ऐकले तरी आपल्याला वाटते ही ज्येष्ठांमधील समस्या आहे. पण असे काही ठरलेले नाही. सध्या जीवनशैलीतील बदलांमुळे तरुणांमध्येही ही समस्या सर्रास दिसून येते. या समस्येवर वेळीच उपाय केला नाही तर ती वाढत जाते. कमी वयात सांधेदुखी होण्याचे नेमके कारण अद्याप सापडले नसून ताणतणाव, अनुवंशिकता आणि हवामानातील बदल यामुळे हा त्रास सतावू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवाबदल होताना किंवा थंडीच्या दिवसात हे दुखणे वाढते. यामध्ये हात, पाय, पाठ, मान इ. अवयव दुखतात. हे दुखणे सकाळी झोपेतून उठल्यावर जास्त असल्याचे जाणवते. कधी अति व्यायामामुळे तर कधी व्यायामाच्या अभावामुळे, आहारात शरीराला आवश्यक पोषक घटक नसल्यानेही ही सांधेदुखी उद्भवू शकते. याला वैद्यकीय भाषेत ऑस्टीओ आर्थायटीस म्हणतात.थोडक्यात सांध्यांची झीज झाल्याने हा त्रास होतो. ताणतणाव हेही यामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता असते. हे दुखणे असे असते की कधी थांबते तर कधी एकाएकी डोळे वर काढते. मग मालिश, औषधे, व्यायाम, फिजिओथेरपी असे सगळे केले जाते. पाहूयात सहज करता येतील असे काही सोपे उपाय...
१. आहारात ओमेगा ३ चा समावेश करा - ओमेगा ३ मुळे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ओमेगा ३ घटक असलेले पदार्थ खाल्ल्याने अर्थायटीसचा त्रास कमी होण्यास मदत होते.सर्व प्रकारचा सुकामेवा, रावस, टुना यांसारखे मासे यांमध्ये ओमेगा ३ असते.
२. व्हिटॅमिन डी - हाडांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. पण हे कॅल्शियम हाडांमध्ये योग्य प्रकारे शोषले जायचे असेल तर त्यासाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. कोवळ्या उन्हात हा घटक मिळत असल्याने लहान मुलांपासून डॉक्टर उन्ह अंगावर घेण्यास सांगतात.
३. वजनावर नियंत्रण - अनेकदा वाढलेले वजन शरीरावर आणि पर्यायाने हाडांवर ताण येण्यास किंवा त्यांची झीज होण्यास कारणीभूत असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक असून ज्यांची हाडे दुखतात त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.
४. व्यायाम करा - शरीरातील वंगण चांगले राहायचे असेल तर व्यायाम करणे आवश्यक असते. यामध्ये चालण्याचा व्यायाम तसेच योगा, मेडिटेशन या गोष्टींचा समावेश असणे महत्त्वाचे आहे. सततच्या स्क्रीन टाइममुळे मान, पाठ, खांदे यांचे दुखणे सुरु होते. पण योग्य प्रकारच्या व्यायामामुळे या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
५. यो्ग्य औषधोपचार - कोणत्याही समस्येवर योग्य उपचार आवश्यक असतात. सांधेदुखीमध्ये आहार, व्यायाम याबरोबरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार आवश्यक असतात.काही वेळा दुखण्याचे स्वरुप पाहून डॉक्टर फिजिओथेरपी अथवा अन्य उपचार सुचवतात. हे उपचार वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते.