फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते असे आपण नेहमी ऐकतो. प्रत्येक फळांमध्ये असणारे गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. फळांमधून नैसर्गिकरित्या शरीराला विविध घटक मिळत असल्याने फलाहार अतिशय चांगला मानला जातो. लहान मुलांनाही सर्व प्रकारची फळे द्यायला हवीत असे आपण वारंवार म्हणतो. थंडीच्या दिवसांत उष्ण असणारी पपई आवर्जून खायला हवी. गोड केशरी रंगाची पपई खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे होतात. पपईच्या गरापासून ते पानांपर्यंत सर्वच गोष्टी अतिशय आरोग्यदायी असतात. चवीला हे फळ जितके छान लागते तितकेच ते आरोग्यासाठी चांगले असते. याबरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्येही पपईचा वापर केलेला असतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार पपईच्या उपयुक्ततेविषयी काय सांगतात पाहूया...
पपईचे आणि पानांचे फायदे
१. पपईच्या फळाबरोबरच पपईची पाने डेंगी, मलेरीया यांसारख्या आजारांमध्ये अतिशय फायदेशीर असतात. या संसर्गजन्य आजारांमध्ये प्लेटलेटस कमी होतात. या कमी झालेल्या प्लेटलेटसचे प्रमाण वाढण्यासाठी पपईच्या पानाचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. मागील काही काळापासून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना हा अतिशय उत्तम उपाय असल्याचे दिसते.
२. ५ ते ७ मध्यम आकाराची पपईची पाने २ लीटर पाण्यात उकळा. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळत राहा. त्यानंतर हे पाणी प्या. पानांचा अर्क पाण्यात उतरल्यामुळे हे पाणी अतिशय औषधी होते.
३. पपईची पाने धुवू कुटून ती चावून खाल्ली तरीही आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. प्लेटलेटस वाढण्यासाठी या पानांचा चांगला फायदा होतो. चवीला कडू असली तरी औषधे खाण्यापेक्षा पपईची पाने खाणे केव्हाही चांगले.
४. पपईचा गर खाण्याबरोबरच पपईचा ज्यूस करुन प्या. यामध्ये थोडा लिंबाचा रस पिळल्यास त्याची गुणवत्ता आणखी वाढते. दिवसातून २ ते ३ वेळा हा ज्यूस प्यायल्यास डेंगी बरा होण्यास मदत होते. लिंबात व्हीटॅमिन सी असल्याने त्याचा आरोग्याला चांगला फायदा होतो.
५. पपई हे चवीला अतिशय गोड असणारे फळ वात आणि कफ प्रकृतीसाठी उपयुक्त असते. स्थानिक ठिकाणी उपलब्ध होणारे आणि उष्ण असलेले हे फळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते, त्यामुळे थंडीच्या काळात पपई आवर्जून खायला हवी.
६. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
७. पपईमध्ये खनिजांचे प्रमाणही जास्त असते. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी, ई आणि ए यांचेही प्रमाण चांगले असते. त्यामुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास हे फळ अतिशय उपयुक्त ठरते.
८. पपईमध्ये फायबर असल्याने ज्यांना पचनाशी निगडीत बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी आहेत, त्यांच्यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते. पपईमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
९. हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तसेच महिलांना पाळीशी निगडित समस्या दूर व्हाव्यात यासाठी पपई उपयुक्त ठरते.