Join us   

Nutrition Week 2022 : दिवसभराच्या कामानं थकवा येतो, हात पाय दुखतात? चांगल्या तब्येतीसाठी तज्ज्ञांच्या ७ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 5:03 PM

Nutrition Week 2022 : मासिक पाळीचे चक्र सुरु होते तेव्हा निरोगी संतुलित आहाराबरोबरीनेच तिच्या शरीरात लोहाचे प्रमाण योग्य राखण्यावर भर दिला गेला पाहिजे.

भारतामध्ये महिलांना आपल्या अधिकारांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, पण आरोग्य ही अशी महत्त्वाची आणि अत्यावश्यक बाब आहे ज्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागता कामा नये. प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे असतात आणि त्यातील प्रत्येक टप्प्यावरील तिच्या पोषण गरजा देखील निरनिराळ्या असतात.  मुलगी जेव्हा किशोरावस्थेत पाऊल ठेवते आणि मासिक पाळीचे चक्र सुरु होते तेव्हा निरोगी संतुलित आहाराबरोबरीनेच तिच्या शरीरात लोहाचे प्रमाण योग्य राखण्यावर भर दिला गेला पाहिजे. (Women's health tips by experts)

मासिक पाळीमध्ये रक्तस्त्रावामुळे शरीराची होणारी झीज भरून निघावी यासाठी हे खूप आवश्यक असते. सेंद्रिय मांस, बीजे, पूर्ण धान्ये आणि मासे यामधून भरपूर प्रमाणात लोह मिळते.  या खाद्यपदार्थांमधील लोह शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जावे यासाठी क जीवनसत्व असलेल्या लिंबू, पेरू, संत्रे आणि आवळा या फळांसोबत त्यांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. डॉ. नियती नाईक (क्लिनिकल डाएटिशियन,कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी  Nutrition Week 2022 निमित्तानं याबाबत अधिक माहिती दिली आहे.

१) शरीरामध्ये लोह शोषले जाण्याच्या मार्गात अडथळा येऊ नये यासाठी या खाद्यपदार्थांचे सेवन चहा किंवा कॉफीसोबत कधीही करू नये. तुमचे जेवण आणि चहा किंवा कॉफी यांच्यामध्ये किमान २० ते ३० मिनिटांचे अंतर असलेच पाहिजे. प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असलेला आहार आणि फळे व भाज्यांमार्फत भरपूर प्रमाणात फायबर यांचे सेवन करणे योग्य आहे. 

२) महिलांना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मायक्रोन्यूट्रिएंट्स अर्थात सूक्ष्म पोषक तत्त्वांची देखील खूप गरज असते. ड जीवनसत्वामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते, त्याबरोबरीनेच महिलांचे प्रजननसंबंधी आरोग्य चांगले राखण्यात देखील याची महत्त्वाची भूमिका असते. बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व ही सूक्ष्म पोषक तत्त्वे देखील महिलेच्या एकंदरीत आरोग्यामध्ये मोलाची भर टाकतात. त्यांच्यामुळे शरीराचे ऊर्जा स्तर नियंत्रणात राखले जातात, केस व नखे मजबूत ठेवण्यात देखील त्यामुळे मदत मिळते. 

३) गरोदर असताना तसेच प्रसूतीनंतर ही जीवनसत्वे खूप आवश्यक असतात, गरोदरपणाचा काळ निरोगी असावा, मळमळ, उलट्या हे त्रास जास्त होऊ नयेत यासाठी ही जीवनसत्वे गरजेची असतात.  त्याचप्रमाणे ज्यामुळे महिलेला पूर्णकालीन वैद्यकीय देखभाल व मल्टी-डिसिप्लिनरी उपचार द्यावे लागू शकतात असा प्री-एक्लेम्पसिया (गरोदरपणात होणारा गंभीर आजार) टाळण्यासाठी देखील ही जीवनसत्वे महत्त्वाची असतात.

४) महिलांसाठी अत्यंत गरजेचे असलेले अजून एक महत्त्वाचे पोषक तत्त्व म्हणजे कॅल्शियम.  रजोनिवृत्तीनंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शरीरातील कॅल्शियमचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, याचा विपरीत परिणाम हाडांच्या आरोग्यावर होतो.  या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. दूध व दुग्धजन्य उत्पादने, बीजे, गडद हिरव्या पालेभाज्या यासारख्या कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असलेल्या पदार्थांचे सेवन संपूर्ण प्रौढावस्थेत करणे आवश्यक असते. 

५) महिलांच्या सक्रिय प्रजननक्षम वयामध्ये पीसीओएस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोमचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. बहुतांश महिलांना हा त्रास असतो. हा त्रास मेटॅबोलिक अर्थात चयापचय क्रियेचे आरोग्य चांगले नसल्याचे दर्शवतो म्हणूनच पीसीओएस टाळण्यासाठी चयापचय क्रिया निरोगी राखणे आवश्यक आहे. यासाठी प्रथिने व फायबर भरपूर प्रमाणात असलेले खाद्यपदार्थ दिवसभर, नियमितपणे, योग्य प्रमाणात खाणे, प्रक्रिया करण्यात आलेले, जंक खाणे टाळणे योग्य ठरते. भरपूर पाणी पिणे, शरीर सक्रिय ठेवणे या गोष्टी देखील महिलांचे एकंदरीत आरोग्य चांगले राहावे यासाठी आवश्यक आहेत. 

६) पीसीओएस असणे म्हणजे चयापचय क्रियेचे आरोग्य चांगले नसणे, याची वेळीच काळजी घेतली गेली नाही तर चयापचयाशी संबंधित मधुमेह, अतिताण, डिस्लीपिडेमिया यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. आले, लसूण, शतावरी, मुलेठी यासारख्या अडॅप्टोजेन्सचा मुबलक समावेश आहारात असल्यास, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि महिलांचे आरोग्य चांगले राहते. महिलांच्या आरोग्याशी निगडित अजून एक महत्त्वाचा घटक आहे झोप. हार्मोनल आरोग्यावर झोपेचा थेट परिणाम होतो. आपल्या झोपेचे दैनंदिन चक्र योग्य आणि नियमित राखणे महिलांसाठी खूप आवश्यक आहे.

७) कुटुंबाची, घराची काळजी घेण्यासाठी महिला त्यांचे सर्वस्व पणाला लावतात पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच त्यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक वेगवेगळ्या आजारांना, समस्यांना सामोरे जावे लागते. निरोगी आहार घेणे, वयानुसार आवश्यक असलेल्या पोषकांचे सेवन करणे आणि ते करत असताना प्रोफेशनल्सच्या सल्ल्यांचे पालन करणे या तीन गोष्टी महिलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स