बुधवारी ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri was having sleep apnea) यांचे निधन झाले आणि संगीत क्षेत्राला पुन्हा एक जबरदस्त धक्का बसला. Obstructive Sleep Apnea या आजाराने बप्पी लहरी यांचं निधन झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. पण हा आजार नेमका कसा असतो, त्याचं स्वरूप काय, लक्षणं कशी ओळखायची आणि कुणाला या आजाराचा सगळ्यात जास्त धोका आहे, असे प्रश्न सामान्य माणसांना पडले आहेत.. त्यासाठीच वाचा की स्लिप अँप्निया हा आजार नेमका आहे तरी काय..
स्लिप अँप्निया म्हणजे नेमके काय?
हा असा एक आजार आहे, ज्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत असताना अचानक झोपेतच श्वास घेण्यास त्रास होतो आणि श्वास रोखला जातो. काही सेकंदाने पुन्हा श्वास सुरू होतो. पण या काळात शरीराला ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गुदमरतो. त्यामुळे त्या व्यक्तीला धाप लागते आणि जाग येते. असा अनुभव जर एखाद्याला वारंवार येत असेल, तर त्याने तात्काळ जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. कारण असं होणं म्हणजे स्लिप ॲप्निया या आजाराचं एक लक्षण असू शकतं. श्वास रोखल्या जाण्याचा वेळ वाढला तर ते जीवघेणंही ठरू शकतं.
या आजारात नेमकं काय होतं?
या आजारादरम्यान छातीच्या वरचा श्वसनाचा जो मार्ग असतो तो बंद व्हायला, त्यामध्ये अडथळा यायला सुरुवात होते. त्यालाच Obstructive sleep apnea स्थिती म्हणतात. यामध्ये रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. लंग्सद्वारे ऑक्सिजन घ्यायला खूपच जास्त कष्ट पडतात. त्यामुळे मग जीव गुदमरल्यासारखे होते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयाच्या कार्यातही व्यत्यय येतो.
या आजाराचा धोका कुणाला?
वैद्यक शास्त्रानुसार जे लोक खूप लठ्ठ आहेत, त्यांना या आजाराचा सगळ्यात जास्त धोका आहे. याशिवाय रात्री जे लोक खूप उशिरा झोपतात, ज्यांनी झोप पुर्ण होत नाही, वारंवार ज्या लोकांना जाग येते, शांत झोप लागत नाही, अशा लोकांनाही स्लिप अँप्नियाचा धोका आहे. त्यामुळे अशी जर काही समस्या जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा.