Join us   

Omicron Variant : फॅशनेबल मास्क घालून मिरवलाही पण ओमायक्रॉनपासून कसे वाचणार? तज्ज्ञ सांगतात, ‘असे’ कापडी मास्क बिनकामाचे कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:29 PM

Omicron Variant : काही रेडी टू स्टिच कपड्यांबरोबर मास्कही ड्रेसप्रमाणेच देण्यात येऊ लागले. हे सारं अंगवळणी पडत नाही तोच आता ओमायक्रॉन नावाची भीती घेरायला लागली.

(Image Credit- dhanas paithani, Pintrest)

पैठणीपासून नथीपर्यंत किती पॅटर्न आणि फॅब्रिक आणि रंगांचे मास्क गेल्या काही काळात अनेकींनी चेहऱ्यावर मिरवले. अनेकींनी यासाठी की, आपल्या साडीला, कपड्यांना, डिझायनर-फॅशनेबल कपड्यांना मॅच होतील, इतरांपेक्षा वेगळे दिसतील असे मास्क शिवले आणि वापरले जाऊ लागले. भला, तेरा मास्क मेरे मास्कसे फॅशनेबल कैसा अशी स्पर्धा असल्यासारखे मास्क बाजारात आले. 

काही रेडी टू स्टिच कपड्यांबरोबर मास्कही ड्रेसप्रमाणेच देण्यात येऊ लागले. हे सारं अंगवळणी पडत नाही तोच आता ओमायक्रॉन नावाची भीती घेरायला लागली. आता प्रश्न असा आहे की, आपण वापरतोय ते फॅशनेबल-कापडी मास्क ओमायक्रॉनपासून आपला बचाव करतील का? फॅशनच्या नावाखाली जो मास्क घालून आपण मिरवतो तो संरक्षण म्हणून काहीच कामाचा नाही असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? पण आता तरी वास्तव तेच आहे.

कोरोना व्हायरसच्या कोणत्याही व्हेरिएण्टपासून बचावासाठी फेस मास्क (Face Mask) वापरण्यावर पहिल्यापासूनच जोर दिला जतोय. पण आपण कसाही मास्क वापरला, नुसता रुमाल किंवा दुपट्टा गुंडाळला तोंडाभोवती तरी विषाणूंपासून संरक्षण मिळेल असं वाटत असेल तर हा गैरसमज आहे. तो वेळीच दूर करुन घ्या. जसजसे कोरोनाचे नवे अवतार येत आहेत तसतसे फेस मास्कच्या गुणवत्तेवर अधिक जोर देणं गरजेचं आहे. 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील (Oxford University) प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेसचे प्रोफेसर ट्रिश ग्रीनहॅल(Professor Trish Greenhalgh) यांच्यामते मास्क घालणे  चांगले असू शकते , पण त्याचे धोकादायक परिणामही होऊ शकतात. म्हणजे काय तर आपण वापरत असलेले मास्क कोणत्या प्रकारचे आहेत? मास्कसाठी कापड कोणतं वापरण्यात आलं आहे यावर आपली सुरक्षितता अवलंबून आहे. बरेच लोक मास्ककडे फॅशन म्हणून पाहतात. मात्र फॅशनपेक्षा मास्कच्या दर्जाकडे अधिक लक्ष द्यायला हवं.

ओमायक्रॉनपासून बचावासाठी कसा मास्क लावायचा?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर ट्रिश ग्रीनहॅल म्हणतात, ''दुहेरी किंवा तिहेरी-लेअर मास्क अधिक प्रभावी असू शकतो. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सरकारे निर्बंध लागू करत आहेत. सुरुवातीला इंग्लंडने सार्वजनिक वाहतूक, दुकाने आणि काही ठिकाणी घरात मास्क घालणे पुन्हा सुरू केले. साथीच्या आजारादरम्यान, निरोगी लोकांनी कधी आणि कुठे फेस मास्क घालावे आणि कोणत्या प्रकारची कव्हरिंग निवडावी याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. ''

सिंगल लेअर मास्क पूर्णपणे सुरक्षा देऊ शकत नाही

प्रोफेसर ट्रिश ग्रीनहॅल यांच्या मते  ''केवळ नियम आहे म्हणून कोणीही मास्क घालू नये. जर मास्कने तुमचे नाक आणि तोंड व्यवस्थित झाकले नाही तर ते निरुपयोगी आहे. N95 रेस्पिरेटर मास्कच्या निर्मात्यांनी हे सुनिश्चित केलेले असते की त्यामुळे 95% कण फिल्टर केले जातात. कॅनेडियन लोकांना सिंगल-लेअर कापडाचे मास्क सोडून देण्याचा सल्ला दिला जात आहे.

जर तुम्हाला मास्क एकापेक्षा जास्त वेळा वापरायचा असेल तर त्याच्या फॅब्रिककडे लक्ष द्या. जर मास्क माफक आणि स्वस्त कापडाचा बनलेला असेल तर तो कमी प्रभावी होईल. त्यामुळे फॅन्सी मास्क खरेदी करताना कापडाच्या दर्जाकडे आणि त्याच्या थराकडे लक्ष द्या जेणेकरून व्हायरसचा धोका टाळता येईल.’

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्या