कधी आपल्याला खूप ॲसिडिटी होते तर कधी पोट साफ होण्यात अडचण येते. कधी खूप गॅसेस होतात तर कधी पोटात गुबारा धरल्यासारखे होते. तुम्हालाही असे होत असेल तर त्यामागे आपली १ सवय कारणीभूत असते. वेळीच ही सवय बदलली नाही तर भविष्यात पूर्ण पचनक्रियाच बिघडते. आता अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे पचनाच्या इतक्या तक्रारी डोकं वर काढू शकतात. तर ती म्हणजे नाश्ता झाल्यानंतर आंघोळ करणे (one major reason behind indigestion problem health care tips).
बऱ्याच महिला सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधी, स्वयंपाक, घरातील साफसफाईची कामं करतात. ही कामं करत असतानाच त्या एका हाताने नाश्ता करतात. नाश्ता करायला वेगळा वेळ नसल्याने बसून वगैरे नाश्ता करणे शक्य नसते. साहजिकच कामं आवरली की घाईघाईत आंघोळीला जातात. मग आंघोळीला जाऊन आवरुनच बाहेर पडू असे त्यांचे गणित असते. पण हे गणित आरोग्यासाठी उपयुक्त नसते. कारण खाल्ल्यानंतर आंघोळ केल्याने पचनक्रियेवर ताण येतो आणि त्याचा शरीरावर वाईट परीणाम होतो. म्हणजे नेमके काय होते याबाबत प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट नेहा रंगलानी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात त्या कोणत्या समजून घेऊया...
१. आपण जेव्हा अन्न खातो रक्ताच्या माध्यमातून शरीरात त्या अन्नाची पचनक्रिया सुरू होते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे, अन्नातील पोषक घटक शरीरात शोषून घेणे अशी कामे या पचनक्रियेमध्ये केली जातात.
२. पण जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा पाणी आपल्या त्वचेवर पडते. यामुळे शरीरभर सुरु असणाऱ्या रक्तप्रवाहाच्या क्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. याचा पचनक्रियेवर विपरीत परीणाम होतो. यामुळे पोटात सूज येणे, क्रॅम्प येणे, अपचन अशा समस्या निर्माण होतात.
३. याशिवाय जेव्हा आपण गार पाण्याने आंघोळ करतो तेव्हा या पाण्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. पण जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा शरीराचे तापमान वाढलेले असते. अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराच्या तापमानात वाढ होते. अशावेळी शरीराचे तापमान कमी केल्याने पचनक्रियेवर ताण येतो. त्यामुळे अतिशय छोटी वाटणारी ही गोष्ट पचनासाठी मात्र त्रासदायक ठरते.