कोरोनाचे निर्बंध आता कुठे थोडे कमी होत होते तर पुन्हा या संसर्गाचा धोका पुन्हा वेगाने वाढायला लागला. आता काही ऑफीसेस सुरू झाली होती तर पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले. आताच्या या काळात आपण सगळ्यांनीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. एकमेकांमध्ये अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात पाण्याने धुणे, मास्कचा वापर करणे यांसारख्या गोष्टी तर आहेतच पण आणखीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे ताणापासून स्वत:ला दूर ठेवणे ही कोविडच्या काळातील सर्वात मोठी गोष्ट आहे. मागील २ वर्षांच्या काळात कोरोनाने आपल्यातील अनेकांना शारीरिक समस्याच दिल्या असे नाही, तर मानसिक तणाव वाढण्यासाठी कोरोनामुळे आलेला लॉकडाऊन हे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटींगहमच्या स्कूल ऑफ मेडिसीनने केलेल्या अभ्यासानुसार, आपले मानसिक आरोग्य आणि आपल्याला कोरोनाचा होणारा संसर्ग यांचा जवळचा संबंध असल्याचे म्हटले आहे. प्राध्यापक कविता वेधरा यांनी केलेल्या संशोधनानुसार काही निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. किंग्ज कॉलेज ऑफ लंडन आणि युनिवर्सिटी ऑफ ऑकलंड याठिकाणी हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. काय आहेत त्यातील निष्कर्ष पाहूया...
१. कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात ज्या लोकांना भिती, ताण, नैराश्य यांसारख्या गोष्टींच्या समस्या होत्या त्या लोकांना कोविडचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक होता आणि बऱ्याच प्रमाणात तसे झालेही.
२. एखाद्या रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्यावर त्याचे गांभिर्य हे त्या रुग्णाची मानसिक स्थिती कशी आहे यावर ठरले.
३. त्यामुळे कोरोना काळात आपल्या आरोग्य यंत्रणेकडून रुग्णाला पुरवल्या जाणाऱ्या सुविधांचा विचार करता संसर्गाचा धोका ज्याप्रमाणे लक्षात घेतला जातो, त्याचप्रमाणे रुग्णाला असलेले नैराश्यही लक्षात घ्यायला हवे.
४. श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांमध्ये असणारे ताण, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे या संशोधनात प्रामुख्याने नोंदवण्यात आले आहे.
५. लॉकडाऊन आणि या साथीच्या काळात लोकांमध्ये ताण आणि भिती यांचे प्रमाण वाढले याचे कारण जीवनशैलीत बदल झाला हे एकच नाही. तर इतर कारणांमुळेही या लोकांना कोविड होण्याची शक्यता निर्माण झाली.
६. न्यूझीलंडमधील युनिवर्सिटी ऑफ ऑकलंड येथील ज्यांना आधीपासून मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत त्या ११०० लोकांवर हा अभ्यास करण्यात आला.
७. सरकारला आपल्या आरोग्य सुविधांबाबत योग्य ते निर्णय घेण्यास मदत व्हावी असा या अभ्यासाचा मुख्य हेतू होता.
८. पण एकूण मानसिक ताण आणि कोविड होण्याचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याचे या अभ्यासातून समोर आले.