आपण चेहऱ्याचे, केसांचे सौंदर्य याकडे पुरेपूर लक्ष देतो. पण चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या दातांकडे मात्र आपण पुरेस लक्ष देत नाही. दातांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे दिसते. यासाठी न चुकता वेळच्या वेळी दात घासणे, दात दुखत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे यांसारख्या गोष्टी नियमित व्हायला हव्यात. (Oral health issues dental health care). 'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आधी तपासणी, उपचार करून घ्या आणि नंतर उपचारांचे पैसे भरा अशी सवलत ग्राहकांना मिळते आहे.
ऑर्थोस्क्वेअर अंतर्गत देशभरात १०० पेक्षा जास्त डेंटल क्लिनिक आहेत. त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे.
घाईघाईत दात घासणे किंवा खूप जोरात दात घासणे हे दातांसाठी योग्य नाही. त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात याविषयी ऑर्थेस्क्वेअर डेंटल क्लिनीकच्या असोसिएट रिजनल डिरेक्टर डॉ. परिधी शुक्ला यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मग दातांकडे लक्ष द्यायचं किंवा आरोग्य चांगलं राखायचं म्हणजे नेमकं काय समजून घेऊया..
दात किडू नयेत म्हणून काय करावं?
१. ब्रशसोबतच फ्लॉसर, माऊथ वॉश, टंग क्लिनर या गोष्टी आवर्जून वापरायला हव्यात.
२. दात स्वच्छ ठेवायचे म्हणून सतत ब्रश करण्याची आवश्यकता नसते. तर सकाळी एकदा किंवा रात्री झोपताना एकदा ब्रश केला तरी पुरेसा असतो.
३. जीभ नीट साफ झाली नाही तर तोंडाला वास येतो, तसंच २ दातांच्या मधे अडकलेले कण निघण्यासाठी फ्लॉसर वापरणे गरजेचे असते.
दात घासण्याची योग्य पद्धत कोणती?
दात खूप वेळ घासायची गरज नसते तर २ मिनीटे दात घासणेही खूप झाले. पण गोलाकार पद्धतीने आणि वरुन खालच्या बाजुला ब्रश ओढून दात घासायला हवेत. जेणेकरुन दातांच्या फटीत काही अडकले असेल तर ते निघायला मदत होते. फक्त पुढचे दात न घासता आतल्या बाजुचे, खालचे दात नीट घासणे महत्त्वाचे असते.
ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?
उठल्या उठल्या ब्रश करण्यापेक्षा चहा किंवा अगदी नाश्ता झाल्यावर ब्रश केला तरी चालतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तोंडात रात्रभर तयार झालेले ॲसिड पचनासाठी फायदेशीर असते. तसेच चहा, नाश्त्यानंतर दातांवर जो थर बसतो तो नंतर ब्रश केल्याने निघून जाण्यास मदत होते. पण रात्री झोपताना आवर्जून ब्रश करायला हवा कारण दिवसभर आपण जे काही खाल्ले असते त्याचे कण दातांवर आणि दातांच्या आजुबाजूला असतात ते निघून जायला हवेत.
दात किडतात म्हणजे नेमकं काय?
आपण जे काही खातो किंवा गोड, कार्बोहायड्रेटस दातांवर अडकतात ज्यामुळे दात किडायला सुरुवात होते. सुरुवात लहान असते पण नंतर ते वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक खाण्यानंतर चांगल्या खळखळून चुळा भरायला हव्यात. त्यामुळे दर ३ ते ६ महिन्यांनी नियमित दातांची तपासणी करायलाच हवी. म्हणजे लवकर उपाय होऊन गंभीर त्रास वाचू शकतात.