Join us   

Ovarian Cancer : तुम्हालाही होऊ शकतो गर्भाशयाचा कॅन्सर, 5 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 4:53 PM

ovarian Cancer : कॅन्सर झाला हे आपल्य़ाला एकाएकी समजते. कारण कॅन्सरची कोणती विशिष्ट लक्षणे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र महिलांनी ठराविक लक्षणांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. जेणेकरुन भविष्यातील गंभीर धोका टळू शकेल.

ठळक मुद्दे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करुन घ्या आणि योग्य तो सल्ला घ्या. असे केल्याने पुढे येणारी मोठी आपत्ती टळेल. थकवा प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि दिर्घकाळ असेल तर ते कॅन्सरचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.

कॅन्सर असं नुसतं म्हटलं तरी आपल्या पायाखालची जमिन हालते. कॅन्सरवर आता उपचार उपलब्ध असले तरी या आजाराचे नाव घेतले की आपल्याला घाबरायला होते. जीवावर बेतणाऱ्या या आजाराचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी काही किमान उपायांनी हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेता येते. कॅन्सचे असंख्य प्रकार असून महिलांमध्ये सामान्यपणे आढळणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर. गर्भाशय मुखाचा कॅन्सर (ovarian Cancer)होणाऱ्या महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले आहे. याचे नेमके कारण समजू शकत नसले तरी गर्भाशयाच्या मुखाशी येणाऱ्या गाठी, गर्भाशयात दुखणे यांसारख्या लक्षणांमुळे या कॅन्सरचे निदान होते. निदान होते तेव्हा उशीर झालेला असल्याने रुग्णाचा जीव वाचतोच असे नाही. त्यामुळे आपल्या शरीराकडे, विविध तक्रारींकडे वेळीच लक्ष दिलेले केव्हाही चांगले...

(Image : Google)

१. कुटुंबात कॅन्सरचा इतिहास

आपल्या कुटुंबातील कोणाला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असले तर अशा व्यक्तींनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. कारण कॅन्सर हा अनुवंशिक आजार असून तो मागील पिढ्यांकडून पुढच्या पिढ्यांना होत असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आपल्या घरातील कोणाला कॅन्सर असेल तर आपण कायम सावध राहायला हवे.

२. अनियमित रक्तस्राव

अनेकदा मासिक पाळीच्या रक्तस्राव तर होतोच पण त्याशिवायही मधे आधे रक्तस्राव होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण रक्तस्राव हे गर्भाशयाच्या कॅन्रचे अक महत्त्वाचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नये. 

३. दिर्घकालीन पोटदुखी 

बरेच दिवसापासून पोटाच्या खालच्या भागात दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण गर्भाशयाच्या पिशवीला सूज येणे, गर्भाशयाच्या पिशवीला गाठ येणे यांसारख्या गोष्टींमुळे ही पोटदुखी उद्भवलेली असू शकते. त्यामुळे दिर्घकाळ पोटदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपाय केलेले केव्हाही चांगले. 

(Image : Google)

४. अपचन आणि सततचा थकवा 

अपचन ही आपल्याला सामान्य वाटणारी समस्या. पण गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये अपचन हे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. तसेच आपल्याला रोजच्या धावपळीमुळे किंवा दगदगीमुळे थकवा येऊ शकतो. पण हा थकवा प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि दिर्घकाळ असेल तर ते कॅन्सरचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. त्यामुळे थकव्याकडे दुर्लक्ष करणेही अनेकदा महागात पडू शकते. 

५. अचानक कमी होणारे किंवा वाढणारे वजन

आपले वजन एकाएकी खूप कमी झाले किंवा खूप वाढले तर हेही गर्भाशयाच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. त्यामुळे आपण स्लीम दिसायला लागलो म्हणून आनंदी होऊ नका किंवा खूप जाड झालो म्हणून ताण घेऊ नका. तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करुन घ्या आणि योग्य तो सल्ला घ्या. असे केल्याने पुढे येणारी मोठी आपत्ती टळेल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग