स्तनांमधे वेदना होणं ही महिलांमधील सर्वसामान्य समस्या आहे. पण या वेदना अशा की ज्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. स्तनांमधे वेदना होणं, स्तन खूप जड पडणं, अवघडणं, स्तनांमधे सूई टोचल्यासारख्या वेदना होणं हे या त्रासाचं स्वरुप आहे. स्तनांमधील या दुखण्याला ‘मासटाल्जिया’ असं म्हटलं जातं. स्तनांमधलं दुखणं हे जसं वेगवेगळ्या प्रकारे जाणवतं तसेच त्यामागील कारणंही भिन्न आहे. तज्ज्ञ म्हणतात असं दुखणं लपवू नये आणि त्याचं टेन्शन घेत रोजचा दिवस घालवू नये. शरीरातील अमूक एखादा भाग दुखला तर त्यामागील कारणांचा आपण अंदाज लावू शकतो. डोकं आज अँसिडिटी झाली म्हणून दुखतंय, पाय खूप उभं राहिल्यानं दुखताय असा ढोबळ अंदाज आपण लावू शकतो पण स्तनांच्या या दुखण्याचं काय कारण असावं याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे अशा दुखण्याकडे एकतर दुर्लक्ष होतं किंवा त्याबद्दल टेन्शन घेतलं जातं.तज्ज्ञ म्हणतात दोन्ही गोष्टी चुकीच्या. त्यापेक्ष आधी हे स्तनांचं दुखणं समजून घ्यायला हवं.
Image: Google
स्तनांच्या दुखण्याचं वर्गीकरण
तज्ज्ञ स्तनांचं दुखणं तीन भागात विभागतात. मासिक पाळी येण्याआधी स्तन दुखत असतील तर या दुखण्याला सायक्लिक पेन म्हटलं जातं. पण मासिक पाळी नाहीये तरीही स्तन दुखताय तर त्याला नॉन सायक्लिक पेन असं म्हटलं जातं. अनेक महिलांमधे स्तन दुखण्याची समस्या रजोनिवृत्तीनंतर उद्भवते. अनेकजणींना कमी वयातही हा त्रास होतो. या तिसर्या प्रकारच्या दुखण्याचं वर्गीकरण करताना त्याला एक्स्ट्रा मेमोरी म्हटलं गेलंय. म्हणजेच दुखणं स्तनांच्या आजू बाजूच्या भागात असतं त्याचा परिणाम स्तनांवर होतो आणि स्तनात वेदना जाणवतात.
का होतात स्तनात वेदना?
स्तनाच्या दुखण्याचं वर्गीकरण तीन भागात केल्यानंतर तज्ज्ञ स्तनांच्या दुखण्यामागची नेमकी कारणंही सांगतात. 1. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळी येण्याच्या दोन तीन दिवसाआधी स्तनात वेदना जाणवतात. शरीरात एस्ट्रोजन आणि प्रोजेसटेरॉन ही दोन संप्रेरकं वाढल्यामुळे स्तनात वेदना होतात. एकदा मासिक पाळी सुरु झाल्यानंतर स्तनातील वेदना शमतात. पण काही महिलांमधे या वेदना मासिक पाळीच्याआधी तीन ते चार दिवस आधी जाणवायला सुरुवात होते.
2. स्तनांमधे वेदना अनेकदा अपघाताने होतात. सायकल चालवताना, खेळताना कुठे पडलं झडलं असेल आणि तेव्हा छातीला लागलं असेल त्यामुळेही स्तनात वेदना होतात. अर्थात तेव्हा ते जाणवत नाही. पण काही काळानं वेदना जाणवतात आणि कारणांचा अंदाज लावता येत नाही. जर असं दुखणं जास्त असेल तर लगेच डॉक्टरांना भेटायला हवं असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
3. चुकीची ब्रा हेही स्तनातील दुखण्याचं कारण असतं. तज्ज्ञ म्हणतात की अनेक महिलांना चुकीची ब्रा वापरल्याने स्तनात दुखतं. ब्राचा उद्देश स्तनांना आधार देणं हा असतो. पण ब्रा जर योग्य पध्दतीच्या घातल्या नाही तर स्तनांना नीट आधार मिळत नाही. यामुळे स्तनांना छातीशी जोडणार्या हाडांच्या बांधणीत ताण येतो आणि त्यामुळे स्तनात वेदना जाणवतात. त्यामुळे स्तन दुखत असतील तर आपण घालत असलेली ब्रा बरोबर आहे ना हे आधी तपासून घ्यावं.
4. व्यायाम करताना शरीराची नेहेमीपेक्षा जास्त गतीने आणि जोरात हालचाल होते. व्यायामतले अनेक प्रकार असे असतात की ज्याचा भार छातीवर, स्तनांवर पडतो. तसेच व्यायाम करताना खास व्यायामासाठीची स्पोर्टस ब्रा घातली तर व्यायामादरम्यान हालचाल झाली तरी स्तनांवर ताण पडत नाही. त्यामुळे आपल्या स्तनातल्या दुखण्यासाठी व्यायाम, खेळ हे देखील जबाबदार असतात.
Image: Google
5. बाळाला दूध पाजणार्या आईला स्तनांमधे दुखतं हे सर्वसामान्यपणे बघितलं जातं. यासाठी आधी डॉक्टरांना भेटून दूध पाजताबा स्तनात का दुखतं हे समजून घ्यायला हवं.
6. अचानक एखाद्या सकाळी उठल्यानंतर आपल्या स्तनात वेदना जाणवतात. आपण हे असं का होतंय यासाठी स्तनांना हात लावून पाहातो. जाणून बुजुन हात लावल्यानंतर हाताला गाठीसारखं लागतं. पण या गाठींना घाबरण्यासारखं काही नसतं. काही दिवसातच या गाठी आपोआप बर्या होतात. पण काही काळानंतरही स्तनात गाठ वाटत असेल तर लगेच डॉक्टरांना भेटुन घ्यावं.
7. स्तनांमधे वेदना ही कॅन्सरची लक्षणं आहे का? असा प्रश्न अनेकींना पडतो . तज्ज्ञ सांगतात स्तनांच्या कर्करोगात स्तनात वेदना होत नाही. त्यामुळेही स्तनातल्या गाठीकडे दुर्लक्ष करतात, कारण कर्करोगामधे गाठी दुखत नाही. गाठ दुखत नसली पण हाताला लागत असली तर लगेच डॉक्टरांना भेटावं. तसेच वरचेवर आपले स्तन दाबून नीट तपासून घ्यायला हवेत.