काळ बदलला की सगळ्याच गोष्टी बदलतात हे खरे आहे. पण काही ठराविक काळाने जुन्या फॅशन परत येतात आणि जुन्या गोष्टींचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच कळायला लागते. सध्या लोखंडाची, पितळ्याची, तांब्याची आणि अगदी मातीची भांडी वापरण्याचेही फॅड आले आहे. एकीकडे स्टील, अॅल्युमिनिअम किंवा निर्लेप कोटींग असलेल्या भांड्यांचा वापर वाढला असला, तरी आजही अनेक जण पारंपरिक धातूंची भांडी स्वयंपाकासाठी आवर्जून वापरताना दिसतात. आपल्या आजीचे, आईचे किंवा अगदी बाजारातून आणलेले पितळ्याचे पातेले किंवा कढई अनेकांच्या घरात वापरात असते. पूर्वी वापरली जाणारी पारंपरिक धातूंची भांडी वापरणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे म्हटले जाते (perfect kitchen utensils Brass). पण ही भांडी वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. लीना बावडेकर पितळ्याची भांडी वापरण्याविषयी काही महत्त्वाची माहिती देतात.
१. पितळ्याच्या भांड्यांना आतल्या बाजुने कल्हई केलेली असते. ही कल्हई नियमितपणे करायला हवी. कल्हई गेलेल्या भांड्यात शिजवलेले अन्न आरोग्यासाठी म्हणावे तितके पोषक नसते. त्यामुळे कल्हई गेल्यास ती करुन मगच ही भांडी स्वयंपाकासाठी वापरायला हवीत.
२. पितळ्याची पातेली, कढई यांसारख्या वेगवेगळ्या आकारांच्या भांड्यांमध्ये वरण गरम करणे, आमटी करणे, फळभाज्या करणे अशा गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्यामुळे डाळींची पोषकता वाढण्यास मदत होते. यामुळे आमटीला एकप्रकारचा स्वाद येण्यास मदत होते.
३. अनेकदा आपण आमटीला टोमॅटो किंवा चिंच, आमसूल घालतो. अशावेळी पितळी भांड्याचा वापर टाळायला हवा. कारण आंबट पदार्थ आणि पितळ यांची रिअॅक्शन होऊन त्यापासून तयार होणारे घटक आरोग्यासाठी चांगले नसतात.
४. दही किंवा ताक, ताकाची कढी, ताक घातलेली पातळ भाजी, आमसूल किंवा चिंचेचे सार, टोमॅटोचे सूप यांसारख्या आंबट पदार्थांसाठी पितळी भांड्याचा वापर अजिबात करु नये.
५. पितळी भांड्यात अन्न शिजवून झाले की ते दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून ठेवावे. कारण शिजलेले अन्न दिवसभर पितळ्याच्या भांड्यात राहीले तर पितळ जास्त प्रमाणात त्या अन्नात उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न शिजवण्यापुरतीच पितळी कढई किंवा पातेले वापरावे.
६. पितळी पातेल्यात दही, ताक हे पदार्थ चालत नसले तरी दूध मात्र पितळी पातेल्यात तापवलेले चांगले. याबरोबरच पितळी पातेल्यात खीर, बासुंदी असे दुधाचे पदार्थही आपण आवर्जून करु शकतो.