आपण स्वयंपाक करतो तेव्हा स्टील, अॅन्युमिनिअम याबरोबरच लोखंडी तसेच तांब्या-पितळ्याची भांडी वापरतो. पूर्वीच्या काळी स्टील आणि अॅल्युमिनिअम आणि नॉन स्टीक यांसारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा तांबे, पितळ आणि लोखंडाचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता पुन्हा नव्याने लोखंडी भांडी वापरण्याचे फॅड आले आहे (Perfect Kitchen utensils Iron ). जुने ते सोने म्हणत हल्ली अनेक घरांत लोखंडी कढई, लोखंडी तवा, पळी आवर्जून वापरली जाते. शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळावे यासाठी अनेकदा डॉक्टरही लोखंडी भांड्यांचा वापर करायला सांगतात. भाजी, आमटी किंवा अगदी मूगाची खिचडी करण्यासाठी ही लोखंडी भांडी आवर्जून वापरली जातात. यामध्ये केलेले पदार्थ काही प्रमाणात काळे होत असल्याने कुटुंबातील मंडळी नाक मुरडतात. पण यात केलेल्या पदार्थांना येणारी लोखंडाची चव वेगळाच स्वाद देते. आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर ती भरुन निघण्यासाठी लोखंडी भांड्यांचा वापर उपयुक्त ठरतो. हे सगळे खरे असले तरी लोखंडी भांडी वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. लीना बावडेकर सांगतात...
१. भाजी, आमटी, कढी या गोष्टींना फोडणी देण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी लोखंडी कढईचा आवर्जून वापर करु शकतो.
२. पुऱ्या, भजी, इतर तळण हेही आपण लोखंडी कढईमध्ये करु शकतो. पालेभाज्याही लोखंडी कढईमध्ये केलेल्या चालतात.
३. आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास अन्नपदार्थ शिजवल्यानंतर त्यामध्ये लोखंडी पळी घालून ठेवावी. त्यामुळे पदार्थात पळीतील लोह उतरते आणि शरीराला लोह मिळण्यास मदत होते.
४. पोळी किंवा भाकरीसाठी इतर नॉन स्टीक किंवा इंडालियमचे तवे वापरण्यापेक्षा लोखंडी तवा वापरलेला केव्हाही चांगला.
५. आमसूलाचे सार, टोमॅटो सार आवर्जून लोखंडी कढईमध्ये करावेत. त्याला एक वेगळा स्वाद तर येतोच पण या पदार्थांबरोबर लोहाची प्रक्रिया होते जे शरीरासाठी चांगले असते.
६. लोखंडी कढईमध्ये दही किंवा दह्याचे पदार्थ करणे टाळावे. लिंबाचा वापरही लोखंडी कढईत टाळावा.
७. अन्नपदार्थ केल्यानंतर तो लोखंडी भांड्यात ठेवला तर तो काही वेलाने काळसर दिसायला लागतो. त्यामुळे तो खाण्यासाठी चांगला की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. पण लोखंडी कढईमध्ये आपण ५ ते ६ तास अन्नपदार्थ ठेऊ शकतो. त्याहून जास्त तास ठेऊ नये.
८. लोखंडी कढईला गंज आलेला नाही ना हे पाहावे. यासाठी लोखंडी कढई स्वच्छ धुवून, कोरडी करुन, नीट वाळवून मगच ती वापरावी.