मूळव्याध म्हणजे अवघड जागेचे दुखणे. एकदा हे दुखणे सुरू झाले की काही सुधरत नाही. धड बसताही येत नाही आणि चालताही येत नाही. संडासला होणारा त्रास, याठिकाणी होणारी आग यामुळे आपल्याला नको नको होऊन जाते. हल्ली अगदी तिशीपासूनच अनेकांना हा त्रास सुरू होतो. एकदा हे दुखणे मागे लागले की ते लवकर बरे व्हायचे नाव घेत नाही. मूळव्याध म्हणजेच पाईल्स ही आपल्या जीवनशैलीशी निगडीत समस्या असून आपण आहार-विहाराकडे नीट लक्ष दिले तर ही समस्या उद्भवणारच नाही. किंवा उद्भवली तरी नियंत्रणात राहू शकेल. यासाठी आहारात आवर्जून काही गोष्टी खाणे टाळायला हवे (Foods to avoid). अशाने मूळव्याधीचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. मूळव्याधीसाठी औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया असे दोन उपाय असतात. मात्र हा त्रास होऊच नये म्हणून काय खाणे टाळावे (Piles causing foods) याविषयी...
१. ग्लुटेन असलेले पदार्थ
ग्लुटेन असलेल्या पदार्थांमुळे मूळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता असते. आपण नियमित खात असलेल्या गव्हात ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते. याशिवाय मैदा किंवा अन्य काही धान्यांमध्येही ग्लुटेन जास्त प्रमाणात असते. ग्लुटेन हे एकप्रकारचे प्रोटीन असून पचनशक्ती कमी करण्याचे काम या प्रोटीनव्दारे केले जाते. त्यामुळे कमीत कमी ग्लुटेन असलेले पदार्थ आहारात असायला हवेत.
२. गायीचे दूध आणि डेअरी प्रॉडक्ट
काही लोकांना गायीचे दूध किंवा त्यापासून तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ यांमुळे मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. गायीच्या दूधात असणारे प्रोटीन्स मूळव्याधीसाठी कारणीभूत असतात. त्यामुळे गायीच्या दुधाऐवजी सोया मिल्कचा पर्याय उत्तम ठरु शकतो.
३. तळलेले आणि फास्ट फूड
तळलेले आणि फास्ट फूड यामध्ये फायबरचे प्रमाण कमी आणि जास्त प्रमाणात फॅटस असतात. त्यामुळे मूळव्याधीसारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. इतकेच नाही तर या पदार्थांमुळे आरोग्याच्या इतरही समस्या वाढतात. त्यामुळे फास्टफूडपेक्षा सॅलेड, फळं यांसारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खायला हव्यात.
४. अल्कोहोल
अल्कोहोलचे व्यसन हे अजिबात चांगले नाही हे आपल्या सगळ्यांना माहित असते. तरीही कधी मित्रमंडळींसोबतची मजा म्हणून किंवा कधी नशा म्हणून आपण त्याचे सेवन करत राहतो. मात्र एकदा त्याची सवय लागली की आपल्याला ते नियमित घेण्याची इच्छा होते आणि आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत राहतात. अल्कोहोलच्या सेवनाने डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे पोट साफ होण्यातही अडचणी येतात.