बदलत्या जीवनशैलीचा मोठा परिणाम झोपेवर होतो आहे हे सिध्द होत आहे. झोप लागत नाही, झोप अर्धवट येते या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे असं जगभरातले डॉक्टर सांगत आहेत. तर धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे सहा तासापेक्षा कमी झोप घेणार्यांची संख्याही खूप आहे असं अभ्यासक म्हणतात. झोपेचा आणि शारीरिक-मानसिक आरोग्याचा थेट संबंध असतो. कमी झोपेचा परिणाम आरोग्यावर कसा होतो यासबंधीचे अभ्यास झाले आहेत. त्याचे निष्कर्ष विविध सायन्स जर्नलमधे प्रसिध्द झाले आहेत. कमी झोपेवरचा एक अभ्यास सांगतो की शारीरिक आणि मानसिक पातळीवर आराम मिळण्यासाठी सहा ते आठ तासा दरम्यानची झोप आवश्यक असते. सहा तासापेक्षा कमी झोप घेतल्यास मेंदू, चयापचय क्रिया आणि हदय यावर गंभीर परिणाम होवून आजार निर्माण होतात. तसेच आपलं आयुष्यही 12 टक्क्यांनी कमी होतं. हे टाळायचं असेल तर सहा ते आठ तासादरम्यानची गाढ झोप आवश्यक आहे.
Image: Google
अभ्यास सांगतो की झोप नीट आणि पुरेशी न घेण्याचे परिणाम आयुष्य खराब होण्यावर होतो. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, तणाव, अस्वस्थता, सामाजिक आर्थिक परिस्थितीचा तणाव , कामाच्या बदलत्या वेळा यामुळे पुरेशी झोप होत नाही. ही अपुरी झोप आरोग्यास हानिकारक ठरते. अपुर्या झोपेचा नेमका कसा परिणाम होतो यासाठी या अभ्यासाचे निष्कर्ष गांभिर्याने समजून घ्यायला हवेत.
अपुर्या झोपेचे परिणाम
1. अपुरी झोप झाल्यास, शांत झोप न लागल्यास मेंदू सजग राहात नाही. मेंदूची सजगता हळूहळू कमी होते. यामुळे काम करताना चुका होतात. किंवा अपघात होतात. अपुर्या झोपेचा परिणाम आपल्या निर्णयक्षमतेवर होतो. अपुरी झोप मानसिक तणाव वाढवते. अस्वस्थता वाढवते. यामुळे पुढे जाऊन विस्मरण, अल्झायमर असे गंभीर आजार उद्भवतात.
2. अपुरी झोप आणि गाढ झोपेचा अभाव यामुळे हायपरटेंशनची समस्या निर्माण होते. ही स्थिती जर दीर्घकाळ राहिली तर हदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा स्ट्रोक येण्याची शक्यता वढते. पुरेशी झोप घेतल्यास आपलं हदय सुरक्षित राहाण्यास मदत मिळते.
3. झोप पुरेशी झाली नाही तर त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर होतो. पचनक्रिया बिघडते. यामुळे स्वादुपिंडाचं काम बिघडतं. यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. शरीराचा इन्शुलिन प्रतिकार कमी होतो. यामुळे टाइप 2 चा मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेह आणि हायपरटेन्शन हे दोन्ही आजार एकाच वेळेस उद्भवण्याची शक्यता वाढते.
Image: Google
4. खाणंपिणं, व्यायाम यामुळेच रोगप्रतिकारशक्ती वाढते असं नाही तर पुरेशी झोप आणि आराम यामुळेही रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर झोप पुरेशी नसेल तर त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यावर होतो.
5. पुरेशी झोप ही निरोगी आरोग्य आणि दीर्घ आयुष्यमान यासाठी महत्त्वाची आहे. सहा तासांपेक्षा कमी झोपेची सवय जर दीर्घकाळ असेल तर मग आपलं आयुष्य 12 टक्क्यांनी कमी होतं असं हा अभ्यास सांगतो.
Image: Google
झोपेला खूपच लाइटली घेण्याची सवय खूप जणांना आहे. वेळेवर झोपण्याऐवजी काम पूर्ण करणं, मोबाइल पाहाणं, टीव्हीवर सिनेमे पाहाणं, रात्री उशिरापर्यंत पाट्र्या करत रात्र जागवणं या सवयींनी आपल्या जीवनशैलीत आधुनिकतेच्या नावाखाली प्रवेश केला आहे. या सवयींमुळे झोपेकडे होणारं दुर्लक्ष हे गंभीर परिणामांना आमंत्रण देणारं असून ही कमी झोप घेण्याची सवय आताच सुधारायला हवी. वेळेवर झोप येत नसेल, गाढ झोप लागत नसेल तर वेळेत डॉक्टरांना संपर्क करण्याचा सल्ला हा अभ्यास देतो.