Join us   

डोळे येण्याची साथ आल्यानं टेंशन आलं आहे? डॉक्टर सांगतात २ गोष्टी, मुलांसह स्वत:चेही डोळे सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 2:08 PM

Problem of eye conjunctivitis Increase in Monsoon : पावसाळ्यात डोळे येण्याची साथ येतेच, सध्या हा संसर्गजन्य आजार बळावला आहे, वेळीच काळजी घ्या

पुण्यात आणि पुण्याच्या जवळपासच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच राज्याच्या इतर काही शहरांमध्येही डोळ्यांची साथ आली आहे. लहान मुले तसेच मोठ्यांमध्येही ही साथ वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. सर्दी-तापाची किंवा व्हायरल साथ ज्याप्रमाणे पसरते तशीच डोळे येण्याची साथही पसरते. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असून डोळे आलेल्या रुग्णांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा काही दिवसांत या समस्येच्या रुग्णांची संख्या दुप्पट आणि तिप्पट झाल्याचे पाहायला मिळते. डोळा लाल होणे, सुजणे, डोळ्यातून पाणी किंवा चिकट स्त्राव येणे अशा समस्या या काळात उद्भवतात. हा आजार वेगाने पसरु नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते (Problem of eye conjunctivitis Increase in Monsoon).

(Image : Google)

याविषयी जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे सांगतात...

अनेकदा कोणाला डोळे आले की आपण त्यांच्यापासून दूर राहतो किंवा त्या व्यक्तीला गॉगल नाहीतर चष्मा घालण्यास सांगतो. एकमेकांकडे पाहिल्याने डोळयांचा ससर्ग होतो असा आपला समज असतो. मात्र आपले हात डोळ्यांना लागतात आणि हेच हात दुसऱ्या व्यक्तीला लागले तर हा संसर्ग पसरतो. यासाठी सतत डोळे आणि हात स्वच्छ धुणे हा एकमेव उपाय असतो. डोळे आलेल्या व्यक्तीने हात स्वच्छ ठेवावेत. तसेच हात डोळ्यांना अजिबात लावू नयेत. चुकून लागल्यास पुन्हा पुन्हा हात साबणाने धुवत राहावेत. यामुळे हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. योग्य ती स्वच्छतेची काळजी हाच यावरील एकमेव उपाय आहे हे लक्षात घ्यायला हवेत. तसेच घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करणे आवश्यक असते. 

डोळ्यांची साथ येण्याचे कारण -

पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि ओलावा वाढतो. यामध्ये विविध प्रकारच्या विषाणूंची वाढ होण्यास पोषक वातावरण असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत साधारणपणे डोळ्यांची साथ वाढते. डोळ्यात सतत खुपल्यासारखे होणे, डोळे जड वाटून खाज येणे, डोळ्यातून चिकट स्त्राव येणे अशा समस्या निर्माण होतात. हा संसर्ग जास्त असल्यास आणि वेळेत आटोक्यात न आल्यास तापही येण्याची शक्यता असते. मात्र हा संसर्ग वाढू नये आणि पसरु नये म्हणून डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करणे, डोळे वारंवार स्वच्छ पाण्याने धुवत राहणे, सतत डोळ्यांना हात न लावणे हे उपाय अवश्य करायला हवेत. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण