डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
उष्माघातामुळं आपल्याकडं दरवर्षी अनेक लोक बाधित होतात, शेकडो मृत्यू होतात तरी अगदी शिक्षित लोकातही याबाबतीत अनेक संभ्रम असल्याचं आढळतं.. “मी तर भरपूर पाणी पितो किंवा पिते”असा युक्तीवाद मांडणाऱ्या अनेकांना “भरपूर पाणी प्यायलेलं असले की उष्माघात वगैरे काही होत नाही”असा एक मोठा गैरसमज झालेला दिसतो.. कुठलाही आजार असेल तर “भरपूर पाणी प्या” असा सल्ला आपल्याकडे लोकप्रिय असल्याने बहुतांश लोक हायड्रेशनची काळजी घेतात पण काही लोकं याला इतकं जास्त गांभीर्यानं घेतात की “भरपूर पाणी प्यायलोय आता काही होत नाही” अशा समजात राहतात (Problem of Heat Stroke in Summer) ..
जगातलं कुठलंही पेय किंवा कोणतंही पाणी हे तुम्हाला संपुर्ण निरोगी बनवत नाही किंबहुना उष्माघात ही तर बहूपदरी परिस्थिती आहे,निव्वळ पुरेसं पाणी प्यायल्यानं ती टळेलच असं नाही..हायड्रेशन सामान्यत: चांगली गोष्ट असली तरी मानवी शरीराची बदलत्या हवामानाशी किंवा परिस्थितीशी रुळण्याची प्रक्रिया-तापमानातील बदल-संलग्न आजाराचा इतिहास-प्रतिकारक्षमता अशा एक ना अनेक बाबी उष्माघातास कारणीभूत असतात. आरोग्याबद्दल जागरूक असणारे आपण सारे सामान्यत: दोन गटात विभागलेले असतो एक म्हणजे काहीही वाचलं-ऐकलं की स्वत:त लक्षणं जाणवणारे आणि दुसरा म्हणजे ‘हे सगळं ठिके पण मला काही होत नसतं’ अशा समजूतीत वावरणारे..
उष्माघाताच्या बाबतीत लक्षात ठेवायलाच हव्यात ५ गोष्टी..
१. हायड्रेशन म्हणजे जादू नव्हे,बदलत्या तापमानानुसार-वातावरणानुसार आपल्या जीवनशैलीत यथायोग्य बदल केले पाहिजेत. आऊटडोअर काम करणारे-फिल्ड वर्कर्स-मार्केटिंगवाले या मंडळींनी आपले ‘कूलिंग ब्रेक्स’ ठरवले पाहिजेत. दिवसाच्या कुठल्या वेळी आपण कुठं आणि किती वेळ असणार याचं नियोजन केलं पाहिजे.
२. घाम येतोय म्हणजे शरीर उष्णतेसोबत जुळवून घेतंय असंही अनेकांना वाटतं पण कोंदट ठिकाणी-तळघरात-वायूवीजन नसलेल्या ठिकाणी वाढत्या तापमानामुळं घाम आला नाही तरी उष्माघात आपला झटका दाखवू शकतो. हलकी चक्कर-असंमजस स्थिती-गोंधळ-अशक्तपणा-मळमळ-अतीसंवातन अशी काही लक्षणं उष्माघाताचे संकेत असू शकतात..
३. उष्माघातामुळं होणारी गोंधळलेली स्थिती स्वत:पेक्षा समोरच्या व्यक्तीस लवकर लक्ष्यात येते त्यामुळं लवकर निदान व्हायला मदत होते,परिस्थिती लवकर आटोक्यात येते. मात्र ऐन उन्हाळयात नैसर्गिकपणे उष्माघाताचे पेशंट रोजच येतात पण आधीच उन्हाच्या तडाख्यात सापडलेल्या पेशंटला लोकं भर उन्हात दवाखान्यात घेऊन जातात,रस्त्यात पेशंट अधिकच गळपटतो. आधी थोडं पेशंटला सावलीत नेणं-भानावर आणणं-थंडावा देणं-आधार देणं आणि शक्य झालं तर आहे तिथं नर्सिंग केअर आणि मग दवाखान्यात नेणं असा प्राधान्यक्रम हवा..
४. काळजी म्हणून काही जागरुक लोक आधीच ओआरएस किंवा मीठ-साखर-पाणी पितात पण असं प्रिलोड होऊन सगळं आलबेल होतं असं नाही, थकवा आल्यानंतर ते तसंही घाम आणि मुत्रावाटे बाहेर पडतं आणि नंतर खरं तर या पदार्थांची जास्त आवश्यकता असते.
५. भौगोलिक स्थिती-ठराविक तापमानवाढ उष्माघातास कारणीभूत असते असाही अनेकांचा समज असतो परंतू ढोबळपणे थेट असं काही नसतं उदाहरणार्थ विदर्भातला माणुस तिथल्या वातावरणासाठी तयार झालेला असतो,त्याला तिथं कदाचित काही होत नाही पण कोकणात आल्यावर मात्र उष्माघाताचा तडाखा बसू शकतो.
पुर-वादळ यांच्यापेक्षा खरं तर उष्माघातामुळं दरवर्षी कितीतरी जास्त मृत्यू होतात त्यामुळं सुती कपडे वापरणं-नियमानं आवश्यक तितकं पाणी पिणं-११ते ३ या वेळेत शक्य असेल तर थेट उन्हात जाणं टाळणं टोपी,गॅागल,सनस्क्रीन अशा गोष्टी वापरणं आणि कुठलंही लक्षण जाणवलं तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमी संयुक्तिक !
(लेखक जनरल प्रॅक्टीशनर आहेत.)