Join us   

उन्हाळ्यात घामाने मांड्या घासल्यानं काळे डाग पडतात, खूप खाज सुटते? ३ उपाय, दरवर्षी होणारा त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 1:09 PM

Problem of Inner thigh Rashes Summer Care Tips : लगेचच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी यावर इलाज होऊ शकतो.

उन्हाळा म्हटला की घाम आणि सतत होणारी चिकचिक यामुळे अंग ओले होते. घामामुळे या काळात घामोळ्या आणि रॅश येण्याची समस्या उद्भवतेच. महिलांना साधारणपणे काखेत, ब्रेस्टच्या खालच्या भागात, मांड्यांच्या मधल्या भागात घामामुळे हे रॅशेस येतात. मांडीच्या आतल्या बाजूला होणारे रॅशेस आणि काळेपणा ही समस्या कोणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. मांडीची जळजळ होत असेल तर उठणे-बसणे आणि चालणेही अनेकदा अवघड होऊन जाते. हे रॅश इतके वाढतात की त्याठिकाणी खाज येऊन जखमा होतात आणि मग डॉक्टरांकडे जायची वेळ येते. लठ्ठपणा, खूप घट्ट कपडे वापरणे, घाम यांमुळे हे रॅशेस येतात. पण रॅशेसच्या सुरुवातीलाच त्यावर योग्य ते उपाय केले तर ते वाढणार नाहीत. यासाठी लगेचच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी यावर इलाज होऊ शकतो, पाहूयात मांडीचे रॅशेस घालवण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय (Problem of Inner thigh Rashes Summer Care Tips)...

(Image : Google)

१. कपड्यांची  निवड करताना...

मांडीतील घर्षण, पुरळ आणि जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी नेहमीच योग्य कपडे निवडा. कारण बर्‍याच वेळा जास्त घट्ट किंवा जाड कपडे घातल्यामुळे आपल्याला घाम येतो, त्वचा कपड्यांना घासली जाते. त्यामुळे शक्यतो उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत सुती आणि ढगळे कपडे निवडावेत. यामुळे घाम येण्याची शक्यता नसते किंवा आला तरी तो लगेच वाळून जाऊ शकतो. 

२. पावडरचा वापर

याठिकाणची त्वचा पातळ असते. ती घासली गेल्याने सोलल्यासारखी होण्याची शक्यता असते. याठिकाणी घाम येतो आणि मग तिथे आणखी आग होते, अशावेळी चालणे, बसणे सगळेच अवघड होऊन जाते. हे लवकर कोरडे व्हावे आणि भरुन यावे यासाठी याठिकाणी बेबी पावडर किंवा घामोळ्यांसाठी वापरतो ती पावडर घालावी. त्यामुळे हा भाग कोरडा होऊन लवकर बरा होण्यास मदत होते.

(Image : Google)

३. तेल 

नारळ तेल हा बहुतांश समस्यांसाठी एक उत्तम पारंपरिक उपाय आहे. यामध्ये एंटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेला गारवा मिळण्यास मदत होते. मांडीच्या सभोवतालच्या भागात हे तेल लावल्याने घासण्याची समस्या येत नाही आणि यामुळे मांड्यांना काळे डाग पडणे, आग होणे हे त्रास उद्भवत नाहीत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलहोम रेमेडीत्वचेची काळजी