Join us

जेवणानंतर अपचन,पोटफुगी, गॅसेसचा त्रास? उत्तम उपाय 3 ‘वंडर टी’, एकदम इफेक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:37 IST

जेवल्यानंतर रोजच पोटात गॅस होणं, पोट फुगणं यासारखे त्रास झाल्यावर सोडायुक्त थंड पेयं पिली जातात. त्यामुळे तात्पुरतं बरं वाटत असलं तरी त्याचा आतड्यांवर गंभीर परिणाम होतो. हे असे हानिकारक पेयं घेण्यापेक्षा यावर पुदिना, आलं आणि बडिशेप यांचा वापर करुन तीन सोपे घरगुती उपाय करता येतात.

ठळक मुद्दे गॅसशी संबंधित समस्यांवर पुदिन्यांची पानं खूप प्रभावी उपाय आहेत.आल्याचा चहा जेवणाअगोदर पिल्यास जेवणानंतर त्रास होत नाही. बडिशेपाच्या वंडर टीमुळे पोटातला गॅस मोकळा होतोच पण सोबत छातीत जळजळ होत असल्यास, छाती दुखत असल्यास हा त्रासही थांबतो.

आपला भारतीय स्वयंपाक हा मसालेदार असतो. त्यामुळे तो चविष्ट तर लागतोच. पण बर्‍याचदा मसाल्यांचं प्रमाण थोडं इकडे तिकडे झालं की पचनाच्या समस्या निर्माण होतात. बहुतांशवेळा पचन बिघडण्याचं कारण वैद्यकीय तज्ज्ञ मसालेदार जेवण असंच सांगतात. जड, मसालेदार पदार्थ खाल्ले की अपचन, उचकी, छातीत जळजळ, पोट दुखणे, मळमळणं या त्रासांसोबतच आतड्यांना सूज, अल्सर यासारख्या गंभीर समस्याही निर्माण होतात. काहींना जेवल्यानंतर रोजच पोटात गॅस होणं, पोट फुगणं यासारखे त्रास होतात. त्यामुळे अस्वस्थता वाढते. अशा वेळी अनेकदा सोडायुक्त थंड पेयं पिण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तात्पुरतं बरं वाटत असलं तरी त्याचा आतड्यांवर गंभीर परिणाम होतो. हे असे हानिकारक पेयं घेण्यापेक्षा यावर पुदिना, आलं आणि बडिशेप यांचा वापर करुन तीन सोपे घरगुती उपायही करता येतात. या तीन घटकांचा वापर करुन पचन विकारांवर मात करणारे वंडर टी करता येतात.

Image: Google

पोटात गॅस झाल्यास

1. गॅसशी संबंधित समस्यांवर पुदिन्यांची पानं खूप प्रभावी उपाय आहेत. पुदिन्याचा समावेश जडी बुडींमधे केला जातो. पुदिन्याच्या पानांचा एक चमचा रस पिल्यास किंवा पुदिन्यांच्या पानांचा चहा पिल्यास पोटातील गॅस मोक्ळा होतो. अस्वस्थता कमी होते. जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं होतं त्यावरही हा उत्तम उपाय आहे. एक कप पाणी घ्यावं. त्यात दहा ते बारा पुदिन्याची पानं घालून ते पाणी उकळावं. पाणी निम्म झालं की ते चहासारखं गरम गरम प्यावं. यात एक चमचा मध घातलं तरी चालतं. या उपायानं पोटात थंडावाही निर्माण होतो.

Image: Google

2. जेवणानंतर पोटात गॅस होत असल्यास त्यावर आल्याचाही चांगल परिणाम होतो. यासाठी एक इंच आलं धुवून घ्यावं. त्याचे बारीक तुकडे करावेत. दोन कप पाणी उकळायला ठेवावं. त्यातच आल्याचे तुकडे घालावेत. पाणी उकळून निम्मं झालं की ते गाळून घ्यावं आणि गरम गरम प्यावं. आल्यात जिंजरोल हा घटक असतो. या घटकात अँण्टिऑक्सिडण्ट आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. आल्याचा हा चहा जेवणाअगोदर पिल्यास जेवणानंतर त्रास होत नाही.

Image: Google

3. पोटात गॅस होण्यासोबतच छातीत जळजळही होत असल्यास बडिशेपाचा उपयोग करावा. यासाठी बडिशेपाचा वंडर टी करावा. एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात एक चमचा बडिशेप घालावी. हे पाणी किमान पाच मिनिटं उकळू द्यावं. नंतर पाणी गाळून ते प्यावं. या वंडर टी मुळे पोटातला गॅस तर मोकळा होतोच पण सोबत छातीत जळजळ होत असल्यास, छाती दुखत असल्यास हा त्रासही थांबतो.