लहानपणी बागेत गेलो किंवा एखाद्या जत्रेच्या ठिकाणी गेलो की आवर्जून घेतली जाणारी गोष्ट म्हणजे बुढ्ढी के बाल. गुलाबी रंगाचे हे म्हातारीच्या केसांसारखा दिसणारा हा खाऊ स्वस्तात मस्त असल्याने पालकही मुलांना अगदी सहज घेऊन देत. हे विकणारा व्यक्ती अनेकदा आपल्या डोळ्यासमोर साखरेपासून हे बुढ्ढी के बाल बनवून देत असत. चवीला अतिशय गोड असणारे हे बुढ्ढीके बाल दिसायला मोठे दिसत असले तरी ५ ते १० मिनीटांत फस्त होत असत. एकदा हा खाऊ घेतला की लहान मुलांच्या आनंदाला पारावार राहायचा नाही. आजही गणपतीच्या दिवसांत, बागेच्या बाहेर किंवा गावाकडे हे बुढ्ढीके बाल अगदी सर्रास विकले जातात (Puducherry banned on Cotton candy buddhi ke bal because of toxic chemicals).
लहान मुलंच काय पण मोठेही आवडीने हा पदार्थ खाताना दिसतात. पण यामध्ये साखरेशिवाय नेमक्या कोणत्या घटकांचा वापर केलेला असतो हे मात्र आपल्याला माहित नसते. पाँडिचेरीमध्ये हे बुढ्ढी के बाल विकण्यावर बंदी आली आहे. इंग्रजीत ज्याला कॉटन कँडी म्हणतात त्यावर या राज्यात बंदी घालण्यात आली आहे. पाँडिचेरीचे उपराज्यपाल तमिलसाई साउंडराजन यांनी या पदार्थामध्ये आरोग्यास घातक घटक असल्याने बंदी केल्याचे सांगितले. याबाबत खुलासा करताना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना यामध्ये रोडामाइन बी असल्याचे निदर्शनास आले. हा एकप्रकारचा विषारी पदार्थ असून तो डायच्या स्वरुपात काम करतो. शरीरातील उती आणि पेशींवर याचा विपरीत परीणाम होतो आणि शरीरात अनावश्यक रासायनिक घटक जातात.
जास्त प्रमाणात आणि दिर्घकाळ बुढ्ढी के बाल खाल्ले तर यकृताच्या आणि कॅन्सरसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपराज्यपाल साउंडराजन यांनी एका व्हिडिओद्वारे राज्यात या पदार्थावर बंदी आणण्यात आलेली असून लहान मुलांनी आणि मोठ्यांनीही हे खाऊ नये असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे यापुढे पाँडिचेरीमध्ये बुढ्ढीके बाल विकण्यास आणि खाण्यास बंदी असून इतर राज्यांमध्येही अशाप्रकारची बंदी येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.