गोड खाणे हे सध्या अनेकांसाठी अजिबात नको असलेली गोष्ट झाली आहे. वाढते वजन, डायबिटीस यांसारख्या समस्यांमुळे गोड खाण्यावर बंधने आली आहेत. मात्र काही पदार्थांना गोडाशिवाय पर्याय नसतो. पण अशावेळी साखर किंवा गूळ, स्विटनर्स यांचा वापर न करता खजूर, बेदाणे यांसारख्या नैसर्गिक गोडवा असणाऱ्या पदार्थांचा वापर करण्याचा सध्या ट्रेंड आहे. मग एखादी स्मूदी असो किंवा बेक केलेला केक असो हा पदार्थ गोड होण्यासाठी आवर्जून यापैकी कशाचा ना कशाचा वापर केला जातो. आता यातही खजूराचा वापर करणे आरोग्यासाठी जास्त चांगले की बेदाण्यांचा वापर करणे. याबाबत आपल्या मनात संभ्रम असण्याची शक्यता असते. यासाठीच गुंजन तनेजा आपल्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. या दोन्ही पदार्थांविषयी त्या नेमक्या काय सांगतात पाहूया (Raisins or Dates which is better for natural suger intake)...
बेदाण्याचे गुणधर्म
द्राक्षं सूकवून त्यावर प्रक्रिया करुन केल्या जाणाऱ्या बेदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. साधारणपणे १०० ग्रॅम बेदाण्यात ३०० ग्रॅम कॅलरीज असतात. यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही खूप जास्त असते. यासोबतच यामध्ये फायबर, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन्स, लोह, पोटॅशियम हे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे घटक असतात. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी बेदाणे खाणे अतिशय चांगले असते.
खजूराचे गुणधर्म
खजूराला थोडा कॅरेमलसारखा फ्लेवर असतो मात्र तेही चवीला अतिशय गोड असतात. खजूराचे बरेच प्रकार बाजारात पाहायला मिळतात. १०० ग्रॅम खजूरात साधारणपणे २८० कॅलरीज असतात. यातही नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते मात्र पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, बी कॉम्प्लेक्स यांसारखे घटक चांगल्या प्रमाणात असल्याने खजूर आरोग्यासाठी अतिशय लाभदायी असतो.
त्यामुळे हे दोन्हीही घटक पोषण देणारे असले तरी त्यामुळे कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढतात तसेच त्यात साखरचे प्रमाणही जास्त असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्या गेल्या तर वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे दोन्ही खाताना योग्य प्रमाणात खाल्ले जाईल याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा एकीकडे साखर कमी करण्याच्या नादात दुसरीकडे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज द्याल.