स्वयंपाकासाठी, पुजेसाठी नारळाचा वापर आपण वरचेवर करतच असतो. सणावाराला नारळाचे लाडू, बर्फी, भात असे विविध गोड पदार्थही तयार केले जातात. नारळाचं पाणी आणि नारळाचा गर आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. त्यामुळे नारळाच्या शेंड्या, नारळाचे कवटी टाकून दिली जाते. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नारळाच्या शेंड्यांमधे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. पूर्वी या शेंड्या भांडे घासण्यासाठी वापरल्या जात. आजही ग्रामीण भागात त्यांचा तसा उपयोग होतो, शिवाय खत तयार करण्यासाठी , झाडं लावताना नारळाच्या शेंड्याचा वापर करतात हे आपल्या परिचयाचं आहे. पण नारळाच्या शेंड्यांचा उपयोग आरोग्यासाठी होतो, त्यामुळे त्या फेकून न देता आरोग्यासाठी कशा वापरायच्या हे समजून घ्यायला हवं. लखनौमधील आयुर्वेदिक डॉक्टर मनीष सिंह यांनी नारळाच्या शेंड्यांचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे फायदे सांगितले आहे. अर्थात जुन्या पिढीतल्या लोकांना या गोष्टींचं ज्ञान होतं आणि ते वापरण्याचा अनुभवही होता. पण त्या ज्ञानाकडे जुनं म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण त्याच जुन्या ज्ञानाची, अनुभवाची चचा आता पुन्हा सुरु झाली आहे.
Image: Google
आरोग्यदायी नारळाच्या शेंड्या
1. शरीराला कुठेही सूज आली की आपण ती दूर करण्यासाठी तिथे खोबर्याचं तेल वापरतो. पण नारळाच्या डॉ. मनीष सिंह सांगतात की नारळाच्या शेंडयांचा उपयोग सूज उतरण्यासाठी होतो. सूज उतरवण्यासाठी नारळाच्या शेंड्यांची पावडर करुन त्यात हळद घालावी. थोडं पाणी घालून त्याचा लेप तयार करावा. हा लेप सूज आलेल्या जागी लावावा. या लेपामुळे सूज कमी होते. एखाद्या झाडाच्या पानाच्या सहाय्याने सूज आलेल्या जागी लेप लावून ती जागा कापडाच्या पट्टीने बांधली तर सूज लवकर उतरते.
Image: Google
2. दात पिवळे असण्याच्या समस्येमधे नारळाच्या शेंड्यांचा उपयोग प्रभावी ठरतो. या शेंड्या दंतमंजनासारख्या वापरल्या जातात. त्यासाठी नारळाच्या शेंड्या भाजून घ्याव्यात ,. भाजलेल्या शेंड्या मिक्सरमधे वाटून त्याची पावडर करुन घ्यावी. या पावडरमधे थोडा बेकिंग सोडा घालावा आणि या मिश्रणानं दात घासावेत. यामुळे दात स्वच्छ तर होतातच शिवाय दातांचा पिवळेपणाही निघून जातो. ही पावडर दातांना लावताना ती रगडून न लावता हलक्या हातानं ब्रश करत लावावी.
3. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल डाय मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. या डायचे तोटे माहित असूनही केवळ काळ्या केसांच्या मोहापायी रसायनयुक्त डाय वापरलं जातं. पण नारळाच्या शेंड्यांचा उपयोग केसांसाठी पोषण म्हणून होतो . नारळाच्या शेंड्यांपासून हेअर डाय तयार कराण्यासाठी नारळाच्या शेंड्या कढईत गरम करुन घ्याव्यात. शेंड्या चांगल्या भाजक्या गेल्या की त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करावी. या पावडरमधे थोडं नारळाचं तेल घालून ते चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण मग केसांना लावावं. एका तासानंतर केस धुवून टाकावेत.
Image: Google
4. डॉ.मनीष सिंह सांगतात की, मूळव्याधीच्या त्रासात नारळाच्या शेंड्याचा उपयोग चांगला आहे. यासाठी नारळाच्या शेंड्या जाळून त्याची बारीक पावडर करावी. मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी शेंड्यांची पावडर करुन ती रोज सकाळी रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ही पावडर रिकाम्या पोटी घेतल्यानं मूळव्याधीचा त्रास कमी होतो. तसेच नारळाच्या शेंड्यांमधे फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराशी निगडित अनेक समस्या नारळाच्या शेंड्यांपासून कमी होतात, सुटतात.
5. पाळी दरम्यान अनेकींना पोट खूप दुखण्याची तक्रार असते. ही तक्रार दूर करण्यासाठी नारळाच्या शेंड्यांचा उपयोग होतो असं डॉ. मनीष सिंह सांगतात. यासाठी या शेंड्या भाजून त्याची पावडर करुन ती पाण्यासोबत पिल्यास वेदना कमी होतात.