Join us   

सततच्या घामाने तुम्हीही हैराण आहात? करा 'या' सोप्या गोष्टी, होणार नाही चिकचिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 9:42 AM

reasons and remedies for excess sweat problem : घामाघूम झाल्यावर चिकचिक तर होतेच पण अंगाला वासही येतो, हे नको असेल तर डॉक्टर सांगतात...

डॉ. पौर्णिमा काळे

आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ

अतिस्वेद म्हणजेच घाम येणे ही एक सामान्य समस्या आहे. सततच्या घामाने आपण अस्वस्थ होतो. घाम हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु कोणतीही विशेष हालचाल नसताना खूप जास्त प्रमाणात येत असेल तर हे काही समस्यांचे लक्षण असू शकते. घाम येण्यामागे बरीच कारणे असतात. ती समजून घेतली आणि रोजच्या जीवनशैलीत काही किमान बदल केले तर हा घाम आटोक्यात आणणे शक्य असते. आयुर्वेदानुसार अतिस्वेद म्हणजेच अतिप्रमाणात घाम येणे हा पित्तदोषाच्या असंतुलनाशी संबंधित आहे. पित्त शरीरातील उष्णता आणि चयापचय नियंत्रित करते. जीवनशैली, आहार किंवा भावनात्मक घटकांमुळे पित्त वाढल्यास प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो (reasons and remedies for excess sweat problem).

अतिस्वेदाची कारणे

१. शारीरिक कारणे - 

अ) उष्णता आणि आर्द्रता: गरम वातावरणात नैसर्गिकरित्या घाम वाढतो. शरद ऋतू  म्हणजेच ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये निसर्गातील उष्णता वाढते आणि घाम येण्याचे प्रमाण वाढते.

ब) व्यायाम: शारीरिक क्रिया शरीराचे तापमान वाढवतात, ज्यामुळे घाम येतो.

क) भावनिक ताण: चिंता, भीती घाम ग्रंथीला उत्तेजित करू शकतात.

ड) आहार: मसालेदार अन्न, कॅफिन किंवा गरम पेय घाम वाढवू शकतात.

२. रोगासंबंधी कारणे:

(Image : Google)

अ) हायपरथायरॉईडिझम: थायरॉईडची अति कार्यक्षमता चयापचय वाढवते, ज्यामुळे घाम येतो.

ब) रजोनिवृत्ती: महिलांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे गरम होते आणि रात्रीच् वेळी घाम येतो.

क) मधुमेह: रक्तातील साखरेची कमी पातळी (हायपोग्लायसेमिया) वाढल्यास घाम येतो.

ड) संसर्ग: तापामुळे (ट्युबरक्युलोसिस, मलेरिया) घाम येऊ शकतो.

ई) लठ्ठपणा: शरीराचे जास्त वजन उष्णता निर्माण करते, ज्यामुळे घाम वाढतो.

फ ) दीर्घकालीन समस्या: हृदयाशी संबंधित समस्या, कॅन्सर यांमुळे घाम वाढू  शकतो.

३. आयुर्वेदीक कारणे:

अ) जास्त प्रमाणात मसालेदार, खारट किंवा तळलेले पदार्थ खाणे.

ब) जास्त सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या संपर्कात येणे.

क) भावनिक ताणतणाव आणि राग.

ड) मद्यपान किंवा कॅफिनचे अतिसेवन.

प्रमाणाबाहेर घाम येऊ नये म्हणून उपाय काय? 

१. काकडी, टरबूज, कोहळा , राजगिरा, माठ, दुधी भोपळा, डाळिंब यासारखे थंड पदार्थ खावेत.

२. तूप आणि दूध आहारात समाविष्ट करावा ज्यामुळे पित्त शांत होते.

३. मसालेदार, तेलकट आणि खारट अन्न टाळावे ज्यामुळे उष्णता वाढत नाही आणि घाम येत नाही

४. नारळ पाणी, ताक,आवळा ज्यूस, कोकम सरबत, सब्जा बी पाणी पित्त संतुलित करण्यास मदत करतात, त्यांचा आहारात समावेश करावा.

५. दिवसातून दोन वेळा दोन चमचे दुर्वा स्वरस घेणे, हा रस पित्तशामक असतो

७. सकाळी गुलकंद , मोरावळा घेतल्यास पित्त दोष नियंत्रणात राहण्यास मदत होते

८. खडिसाखर, धणे आणि जिरे वापरुन बनवलेले पेय पित्त कमी करण्यास उपयुक्त ठरते. मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हे पेय घेऊ नये. 

९. शतावरी हे पित्त शांत करण्यासाठी शीतल औषध आहे.

१०. मातीच्या माठामध्ये मोगऱ्याची फुले टाकून त्यातील पाणी प्यावे. याने शरीरातील उष्णता कमी होऊन घाम येणे कमी होते.

११. कपाळावर, गालावर घाम जास्त येत असेल तर त्याठिकाणी चंदन पावडर गुलाब पाण्यात एकत्र करुन त्याचा लेप लावावा.

१२. आंघोळीसाठी खूप गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करावा.

१३. हलके सुती कपडे परिधान करावेत ज्यामुळे घाम सहज सुकतो.

१४. पायांना किंवा हातांना खूप घाम येत असेल तर, रोज खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून मालिश करावे.

१५. शीतली प्राणायाम हा प्राणायाम प्रकार शरीराचे तापमान कमी करतो. जीभेला बाहेर काढून आत श्वास घ्या आणि नाकाद्वारे श्वास सोडा.

१६. शीतकारी प्राणायाम: दातांच्या मध्ये जीभ ठेवून श्वास घेतल्याने शरीराला शीतलता मिळते.

१७. चंद्रभेदी प्राणायाम म्हणजे शरीराला शीतलता देणारा प्राणायाम. "चंद्र" हा शब्द शरीरातील शीतल गुणधर्माचे प्रतीक आहे. या प्राणायामाच्या नियमित सरावाने शरीरात गारवा निर्माण होतो. चंद्रनाडी (डाव्या नाकपुडीतून) श्वास घेऊन सुर्यनाडी (उजव्या नाकपुडीतून) श्वास सोडणे हा या प्राणायामाचा मुख्य भाग आहे.

१८. अनुलोम-विलोम प्राणायाम नियमित केल्यास तणाव कमी होतो आणि शरीराचे तापमान संतुलित राहते.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपायलाइफस्टाइल