हवामानाचा परिणाम म्हणून त्वचा कोरडी (dry skin) पडते. पण हवामान कोरडं नसलं तरी त्वचा कोरडी पडत असेल तर त्यामागे विविध कारणं असू शकतात. चुकीच्या सवयी, आजारपणाचा परिणाम किंवा आरोग्यविषयक समस्यांची लक्षणं म्हणूनही (reasons behind dry skin) त्वचा शुष्क पडते. त्वचा कोरडी पडण्यामागील नेमक्या कारणाचा शोध लागल्यास त्यावर परिणामकारक उपाय करता येतात.
Image: Google
त्वचा कोरडी का पडते ?
1. कपडे धुण्यासाठी , भांडी घासण्यासाठी तीव्र रासायनिक घटक असलेल्या साबण किंवा डिश वाॅशरचा उपयोग केल्यानं हाताची त्वचा कोरडी पडते. हातातला ओलावा, आर्द्रता डिश वाॅशर/ साबण यातील रासायनिक घटक शोषून घेतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडून हाताला खाज येणं, हाता पायाची आग होणं असे त्रास होतात. हे टाळण्यासाठी कपडे आणि भांड्यांसाठी सौम्य प्रकारच्या पावडर, साबण आणि लिक्विडचा वापर करावा.
2. मधुमेहाची समस्या असल्यास हाता पायाची त्वचा कोरडी पडते. विनाकारण त्वचा कोरडी पडत असल्यास आधी दवाखान्यात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तातील साखर वाढल्यास त्याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो. सतत लघवीला जावं लागल्यानं शरीरातील पाणी कमी होतं. शरीरातील पाणी कमी झाल्यानं त्वचा कोरडी पडते.
3. उन्हात जास्त काळ वावरल्यास त्वचा कोरडी पडते. सूर्याच्या अती नील किरणांमुळे त्वचेचं नुकसान होतं. त्वचा खडबडीत होते. सूर्याची अती नील किरणं त्वचेच्या आत पोहोचून कोलॅजन निर्मितीवर परिणाम करतात. त्याचा परिणाम म्हणूनही त्वचा कोरडी पडते.
Image: Google
4. पोहोण्याचा परिणाम त्वचेवर आणि केसांवर होतो. तरण तलावाच्या पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण केस आणि त्वचेवर परिणाम करतं. जास्त काळ पोहोल्यास त्वचेवर्रील तेलकट थर निघून जातो. त्यामुळे त्वचेतील आर्द्रताही कमी होते आणि त्वचा कोरडी होते. म्हणूनच पोहोयाला जाण्याआधी आणि पोहून आल्यानंतर शरीराला माॅश्चरायझरयुक्त क्रीम् लावावं.
5. साधारण चाळीशीनंतर त्वचा कोरडी होते. कारण वयाचा परिणाम म्हणून त्वचेतील लवचिकता कमी होते. त्वचा शुष्क होवून त्वचेवर सुरकुत्याही पडतात. यासाठी त्वचेची काळजी घेताना ॲण्टि एजिंग सीरमचा वापर करावा.
6. आरोग्यविषयक समस्यांवर औषधं घेत असल्यास औषधांचा परिणाम त्वचेवर होवून त्वचा कोरडी होते. त्वचेला खाज येते. यावर उपाय म्हणून आहारात भाज्या आणि फळांचा समावेश असावा. जंक फूड खाणं टाळावं. पुरेसं पाणी प्यावं.
7. सोरायसिस, इसब या त्वचेशी निगडित समस्या असल्यास त्वचा कोरडी होते. त्वचेचे पोपडे निघून त्वचेला जखमाही होतात. यावर उपाय म्हणजे डाॅक्टर सांगतील ते योग्य औषधोपचार घेणे.
8. कडक पाण्यानं आंघोळ करण्याची सवय असल्यास त्वचा कोरडी होते. गरम पाण्याचा परिणाम त्वचेच्या वरच्या थरावर होतो. या थरात असलेल्या केराटिन आणि तेलावर परिणाम होवून त्वचा कोरडी होते. गरम पाणी आणि रसायनयुक्त साबण याचा एकत्रित परिणाम त्वचेवर होवून त्वचा रुक्ष होते. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेच्या कोरडेपणाची समस्ता नुसती वाढतेच असं नाही तर गंभीरही होते.
Image: Google
9. थायराॅइडशी निगडित हायपरथायराॅडिज्म ही समस्या असल्यास त्वचा कोरडी होते. या समस्येत थायराॅइड ग्रंथी कमी प्रमाणात थायराॅइड हे हार्मोन निर्माण करतात. त्याचा परिणम धर्म ग्रंथी आणि तेल ग्रंथीवर होवून या ग्रंथीची क्रिया कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी होते. या समस्येतून उदभवलेला त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी तेक आणि माॅश्चरायझरयुक्त क्रीमचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.
10. थंडीच्या ऋतुत हवामान शुष्क असतं. त्यामुळे त्वचेतला ओलावा कमी होतो. त्यातच जर थंडी घालवण्यासाठी रुम हिटर वापरलं जात असेल तर त्याचा त्वचेवर आणखी गंभीर परिणाम होवून त्वचा शुष्क पडते. अशा वातावरणात माॅश्चरायझरचा वापर जास्तीत जास्त करणं हाच योग्य उपाय होय.