Join us   

योनीमार्गात सतत खाज येते, जळजळ होते? तज्ज्ञ सांगतात ३ महत्त्वाची कारणं आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 3:06 PM

Reasons of Vaginal Itching and Irritation : सारखं खाजवल्याने हा भाग नाजूक असल्याने त्याठिकाणी नंतर जळजळ व्हायला लागते.

ठळक मुद्दे आधुनिक वैद्यकीय ज्ञान इतके प्रगत झालेले असताना उगाच स्वत:चे तब्येतीचे हाल करून घेण्यात काय हशील आहे?खाजच आहे म्हणून दुर्लक्ष न करता कारण समजून घेऊन वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

स्त्रीरोगतज्ज्ञांकडे विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या स्त्रियांमध्ये योनीमार्गात खाज सुटणे ही तक्रार असणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त असते.अनेकदा घामामुळे किंवा स्वच्छता न केल्याने ही खाज येत असेल असा आपला अंदाज असतो. म्हणून आपण ते अंगावर काढतो. मग खाजवू खाजवून ही जागा लाल होते, त्याठिकाणी फोड येतात इतकेच नाही तर या अवघड ठिकाणी आपल्याला खाजवताही येत नाही. सारखं खाजवल्याने हा भाग नाजूक असल्याने त्याठिकाणी नंतर जळजळ व्हायला लागते. 

(Image : Google)

नैसर्गिकरीत्याच योनीमार्ग हा थोडा ओलसर असतो आणि तो तसाच असणे अपेक्षित आहे. योनीमार्गाच्या भागात फार मोकळी हवाही पोहोचू शकत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य व परजीवी (parasitic infections) संसर्ग योनीमार्गात पटकन होऊ शकतात. हे संसर्ग होऊ नयेत यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती कायम प्रयत्न करत असते. काही कारणाने ही शक्ती कमी पडल्यास हे संसर्ग संधी साधून घेतात. आता असं का होतं आणि खाज येण्याची नेमकी कारणं काय ते पाहूयात.  

खाज आणि जळजळ होण्याची कारणे..

१. काही स्त्रियांना योनीमार्गाची अतिस्वच्छता करायची सवय असते. त्यामुळे योनिमार्गात आवश्यक असणारे चांगले जिवाणू ही नष्ट होतात आणि प्रतिकारशक्ती कमी होऊन योनीमार्गात सतत संसर्ग होऊ शकतात.

२.मधुमेह योनीमार्गाच्या संसर्गाचे अतिशय महत्त्वाचे कारण आहे. कधीतरी एखादी random sugar test करून मला शुगर नाही अशी सोयीस्कर समजूत करन घेणे हे आपल्या समाजात सर्रास दिसते. Hba1C ही तपासणी आपल्याला गेल्या तीन महिन्यातली रक्तातील साखर अचूक मोजते त्यामुळे मधुमेहाचे निदान करण्यासाठी ही तपासणी अत्यावश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात नसेल तर कितीही औषधे दिली तरी योनीमार्गाचे संसर्ग आटोक्यात येत नाहीत. तसेच लैंगिक जोडीदारांमध्ये एकाला जरी मधुमेह असेल तर दोघांनाही वारंवार संसर्ग होऊ शकतो.

३.काही स्त्रियांमध्ये विशेष करून चाळीशीनंतर योनीमार्गचा काही भाग पांढरा होतो आणि अतोनात खाज सुटते. या प्रकारच्या आजारात ताबडतोब स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावे लागतात अन्यथा हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

(Image : Google)

उपाय काय?

योनीमार्गात संसर्ग होऊन खाज सुटायला लागली तरी स्त्रिया लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जायचे टाळतात. स्वत:च्या मनाचे घरगुती उपाय, शेजारच्या बायका,मैत्रिणी यांचे सल्ले घेण्यात वेळ घालवतात. मग केमिस्टकडे जाऊन मिळेल ते क्रीम आणून लावत बसतात. खाज सुटल्यावर  कोणतेही तेल लावल्यामुळे योनीमार्गाचा ऑक्सिजन पुरवठा अजून कमी होतो आणि संसर्गाला अजूनच बळ प्राप्त होते. तसेच केमिस्टकडून आणलेल्या क्रीम्स मध्ये स्टेरॉइड असल्यामुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणे संसर्ग वाढत जातो आणि नंतरच्या उपचारांचा प्रतिसाद कमी करून टाकू शकतो. योनीमार्गात सतत संसर्ग होत असेल तर काही वेळा लैंगिक जोडीदाराला ही उपचार द्यावे लागू शकतात. याकडेही बऱ्याच वेळी दुर्लक्ष केले जाते. काही वेळा पुरुष औषधे घ्यायला उगाच  खूप टाळाटाळ करतात.आधुनिक वैद्यकीय ज्ञान इतके प्रगत झालेले असताना उगाच स्वत:चे तब्येतीचे हाल करून घेण्यात काय हशील आहे?

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.) 

shilpachitnisjoshi@gmail.com  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स