Join us   

relief from acidity : तुम्हालाही सतत अॅसिडिटी होते? ४ लाइफस्टाइल बदल, रोज रोजचा त्रास कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 11:46 AM

relief from acidity : अॅसिडीटी झाली की काही सुधरत नाही, मळमळ आणि उलट्यांनी जीव हैराण होतो...त्यानंतर येणारा अशक्तपणा, या सगळ्याला वैतागला असाल तर जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते...

ठळक मुद्दे मानसिकतेचाही आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि आपल्याला अॅसिडीटीसारख्या समस्या उद्भवतात.सतत मसालेदार पदार्थांचे सेवन, प्रमाणापेक्षा जास्त तिखट खाणे, तेलकट पदार्थ, जंक फूडचे सेवन यांमुळेही अॅसिड़ीटी होते.

अॅसिडीटी काय असते हे ज्यांनी अनुभवलंय तेच सांगू शकतील. पोटात आणि छातीत होणारी मळमळ, त्यामुळे येणारे करपट ढेकर, अन्नाचा वासही सहन न होणे आणि त्यानंतर होणाऱ्या उलट्या. हे सगळे झाल्यावर येणारा थकवा आणि अशक्तपणा भरुन यायला पुढे जाणारे दोन दिवस. असा त्रास हल्ली अनेकांना होतो. (How to get relief from acidity) खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन यांमुळे अशाप्रकारच्या अपचनाच्या तक्रारी वाढतात (Acidity Problem) आणि शरीरात आम्ल तयार होते. हे आम्ल जोपर्यंत शरीराबाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्य़ाला आराम मिळत नाही. पण अशारितीने सतत अॅसिडीटी होणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मग कधी जेलोसिल घ्या तर कधी ओमेझ डी, कधी पुदीनहराची गोळी घ्या तर कधी आणखी काही घरगुती उपाय. पण अॅसिडीटीचा त्रास कायमचा दूर होण्यासाठी नियमित जीवनशैलीत काय आणि कोणते बदल करायला हवेत याविषयी...

(Image : Google)

१. वेळेवर आणि आवश्यक तेवढेच जेवणे

आपले शरीर हे एका यंत्राप्रमाणे काम करत असते. आपण त्याला जशी सवय लावू त्याचप्रमाणे ते उत्तमरितीने काम करत असते. एका ठराविक वेळी शरीराला नाश्ता किंवा जेवणाची सवय असेल तर ती सवय नियमितपणे फॉलो करायला हवी. साधारणपणे आपली वेळ झाली की आपल्याला त्यावेळी भूक लागते. पण त्या वेळी हातात काम असेल किंवा काही अन्य कारणांनी जेवण मिळाले नाही तर अॅसिडीची तक्रार उद्भवते. इतकेच नाही तर गरजेपेक्षा किंवा भूकेपेक्षा जास्त खाल्ले गेले तरीही अॅसिडीटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे वेळच्या वेळी आणि जितकी भूक आहे तितकेच जेवणे आवश्यक आहे. 

२. आहाराच्या पद्धती बदलणे 

झोपेतून उठल्या उठल्या आपल्याला भूक लागते. अशावेळी फळ, सुकामेवा, खजूर असे खाण्याऐवजी आपण चहा-बिस्कीट, कॉफी घेतली किंवा घाईत काहीच खाल्ले नाही तरीही अॅसिडीटी होते. सतत मसालेदार पदार्थांचे सेवन, प्रमाणापेक्षा जास्त तिखट खाणे, तेलकट पदार्थ, जंक फूडचे सेवन यांमुळेही अॅसिड़ीटी होते. त्यामुळे आपण नियमितपणे योग्य तो आहार घेत आहोत ना याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. 

(Image : Google)

३. पुरेशी झोप घेणे

उत्तम आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती होणे आवश्यक असते. त्यामुळे रात्री ७ ते ८ तास झोप मिळणे गरजेचे आहे. दिवसभर आपण वेगवेगळ्या कामांसाठी धावत असताना पुरेशी झोप मिळाली नाही तर मात्र शरीरात अॅसिड तयार होते. याबरोबरच हल्ली बरेच जण रात्री उशीरा झोपतात. ऑफीसचे काम, मोबाईल किंवा टीव्हीचा अतिवापर यामुळे रात्री उशीरा झोपले जाते. पण त्यामुळेही शरीरातील आम्ल उसळते. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे हा अॅसिडीटी टाळण्यासाठी उत्तम उपाय आहे. 

४. ताणरहित जीवन

आपल्या प्रत्येकाला रोजच्या आयुष्यात वेगवेगळे ताण असतात. यामध्ये कौटुंबिक तक्रारी, करीयरचा ताण, नातेसंबंधातील तक्रारी, आर्थिक ताणतणाव, आरोग्यविषयक समस्या यांचा समावेश असतो. पण हा ताण किती घ्यायचा आणि गोष्टींकडे कशापद्धतीने सकारात्मकतेने पाहायचे हे आपल्यावर अवलंबून असते. आपण सतत ताण घेऊन एखाद्या गोष्टीचा विचार करत राहिलो किंवा नैराश्यात राहीलो तर मानसिकतेचाही आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि आपल्याला अॅसिडीटीसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे ताणविरहीत जीवन जगणे सर्वात महत्त्वाचे असून त्यादृष्टीने उपाययोजना करायला हव्यात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल