३१ डिसेंबर म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. इंग्रजी कॅलेंडर बदलत असल्याने जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. गेलेल्या वर्षातील कडू आठवणी, गोष्टींना बाय बाय करत नवीन आव्हानं, नव्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मित्रमंडळी, फॅमिली यांच्यासोबत एकत्र येत जेवणाचा, आऊटींगला जाण्याचा किंवा काही ना काही प्लॅन आवर्जून केले जातात. जेवायला छान वेगवेगळे पदार्थ, डान्स, गेम्स, जागरण असं सगळं करत रात्री १२ वाजेपर्यंत जागरण केले जाते. हे सगळे करत असताना जागरण, खाणे-पिणे याचा त्रास होऊ नये आणि नव्या वर्षाचे स्वागत खरंच आनंदात आणि उत्साहात व्हावे यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.3 Tips to take care while celebrating 31st December Party
१. जेवणाबाबत
सगळे एकत्र आलो की आपण तळलेले, मैद्याचे किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची शक्यता जास्त असते. मात्र आपल्याला अशा प्रकारच्या आहाराचा त्रास होत असेल तर आधीपासूनच आहारावर नियंत्रण ठेवावे. आपल्याला पचेल, झेपेल तेवढेच पदार्थ खाल्लेले केव्हाही जास्त चांगले. सगळ्यांसोबत नेहमीपेक्षा ४ घास जास्त खाल्ले जातात. हे ठिक असले तरी आपली भूक आणि पचनक्रिया यांचा अंदाज घेऊन आहार घ्यायला हवा.
२. जागरण
एखादवेळी जागरण ठिक असले तरी काही जणांना जागरणाने त्रास होण्याची शक्यता असते. पुरेशी झोप झाली नाही तर अॅसिडीटी किंवा डोकेदुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडावेळ जागरण करणे ठिक आहे. पण अगदी मध्यरात्रीपर्यंत जागरण करु नये. लहान मुले, वयस्कर व्यक्ती किंवा जुने आजार असणाऱ्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
३. पार्टी करताना
जुन्या वर्षाला निरोप द्यायचा म्हणून अनेक जण पार्टीचे आयोजन करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसने केली जातात. त्या व्यसनांचा आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. अनेकदा पार्टीमध्ये खूप जास्त डान्सही केला जातो. आपण आऊटडोअर असू तर थंडीमुळेही त्रास होऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टींची योग्य ती काळजी घेऊन सेलिब्रेशन केले तर ते जास्त आनंददायी होऊ शकते.