आपल्या शरीराचा ६० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो असे म्हटले जाते. उत्तम आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील विषारी द्रव्ये किंवा अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकून देण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. खाल्लेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी तसेच इतरही अनेक क्रियांसाठी पाणी आवश्यक असते. दिवसाला प्रत्येक व्यक्तीने किमान ३ लिटर पाणी प्यायला हवे असे म्हणतात. आता हे जरी ठिक असले तरी पाणी कोणत्या वेळेला प्यावे, ते पिण्याची योग्य पद्धत कोणती, ते कशाप्रकारे प्यावे याबाबत माहिती घेतल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. याबद्दल वैद्य लीना बावडेकर सांगतात...
१. जेवणानंतर पाणी पिणे -
जेवणादरम्यान एक एक घोट पाणी प्यायलेले चालते. तसेच ज्यांना बारीक व्हायचे आहे त्यांनी जेवणाच्या आधी थोडे पाणी पिऊन मग जेवायला सुरुवात करावी. म्हणजे पाण्याने पोट थोडे भरलेले राहते आणि आपसूकच कमी अन्न पोटात जाते. जेवणानंतर पाणी प्यायल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होत नाही तसेच आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. जेवणानंतर दिड तासाने पाणी प्यायला हवे. जेवताना एखाद दोन वेळा घोटभर पाणी प्यायलेले चालेल पण सतत पाणी प्यायले तर जेवण नीट जात नाही.
२. तहान लागल्याशिवाय पाणी पिणे -
आपले शरीर आपल्याला सगळ्या प्रकारचे संकेत देत असते. त्यानुसार तहान लागल्याचाही संकेत शरीर देते. त्यामुळे तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायलेले केव्हाही चांगले. अनेकदा जास्त पाणी प्यायला हवे म्हणून आपण कितीही पाणी पित सुटतो. तहान लागलेली नसतना पाणी प्यायल्याने आपण शरीराला ते पाणी आत घेण्यास जबरदस्ती करतो. त्यामुळे शरीर त्या पाण्याचे योग्य पद्धतीने पचन करु शकत नाही. कधी कोणी सकाळीच २ लिटर पाणी पिते तर कोणी दिवसातून ५ लिटर पाणी पिते. पण प्रत्येकाचे शरीर वेगळ्या पद्धतीने बनलेले असते. त्यामुळे प्रत्येकाची भूक ज्याप्रमाणे वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची तहानही वेगळी असते. म्हणूनच व्यक्तीनुसार या गोष्टींचे प्रमाण बदलत असल्याने यासाठी कोणताही एक ठोस नियम सांगता येणार नाही. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे
३. गार पाणी पिणे -
अनेकदा बाहेर ऊन आहे म्हणून किंवा जास्त तहान लागली म्हणून आपण गारेगार पाणी पितो. पण असे गार पाणी पोटातून लहान आतड्यामध्ये जायला खूप जास्त वेळ लागतो. या पाण्याचे तापमान सामान्य करण्यासाठी शरीर बरीच ऊर्जा खर्च करते. या तुलनेत कोमट आणि सामान्य तापमानाचे पाणी कमी वेळात पोटातून लहान आतड्यामध्ये जाते. गार पाण्यामुळे जठराग्नी मंद होतो. याचा पचनशक्तीवर परिणाम होतो आणि त्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. काहीही गार खाल्ल्यानंतर लगेच कोमट पाणी प्यायला हवे. तसेच ऋतूनुसार पाणी प्यायला हवे.
४. उभे राहून पाणी पिणे
अनेकदा आपण घाईघाईत उभे राहून बाटलीने किंवा ग्लासने पाणी पितो. पण असे करण्याने पाणी एकदम वेगाने खाली जाते आणि ते शरीरातील इतर रसांसोबत मिसळले जात नाही. त्यामुळे पचनाशी निगडीत तक्रारी उद्भवू शकतात. पाणी शरीरातील घटकांसोबत मिसळून त्यांच्याच योग्य ती क्रिया होणे आवश्यक असते. मात्र उभे राहून गटागटा पाणी प्यायल्याने ही क्रिया राहून जाते. बसलेले असताना आपला पोटाचा भाग हा रिलॅक्स असतो त्यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने शोषले जाते. त्यामुळे शांतपणे बसून पाणी प्यायलेले केव्हाही चांगले.
५. गटागटा पाणी पिणे
पाणी पिताना एक एक घोट शांतपणे पाणी पिणे आवश्यक असते. पण अनेकदा तहान लागल्याच्या नादात किंवा घाईत आपण गटागटा पाणी पितो. त्यामुळे पाणी लाळेसोबत मिक्स होत नाही आणि जी रसायने तयार व्हायला हवीत ती होत नाहीत. तसेच शरीराला आवश्यक नसलेली रसायने तयार होतात. त्यामुळे अॅसिडीटी आणि त्याच्याशी निगडित इतर समस्या निर्माण होतात. म्हणूनच पाणी पिताना ते अतिशय शांतपणे एक एक घोट पिणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले.