Join us   

भात म्हटलं की भीती वाटते? रिसर्चचा दावा, भात 'योग्य' रीतीने शिजवा, बिंधास्त खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 2:43 PM

पचायला सहज, पटकन होणारा, कशासोबतही छान लागणारा सोबत आरोग्यदायी असं बिरुद मिरवणारा हाच भात आरोग्यास घातकही असतो, असं एक अभ्यास सांगतो. भात आरोग्यासाठी घातक कसा? काय असतं त्यात धोकादायक? हा धोका टाळायचा असेल तर..? 

ठळक मुद्दे तांदळात विषारी घटक असतात हे सांगणारा अभ्यास नुकताच झाला आहे.जगभरात उपलब्ध असलेल्या अनेक भागातील तांदळात आर्सेनिकचं प्रमाण आढळतं.आपल्याला प्रिय असणारा भात हा कॅन्सरला कारणीभूत ठरु शकतो.

आपल्या जेवणाचं ताट भाताशिवाय पूर्ण होत नाही. पोळी, भाजी, सलाड, लोणचं, पापड, कोशिंबिर, चटणी, वरण आणि भात हे पदार्थ ताटात असले की याला पूर्ण जेवण असं म्हणतात. तर भारतात काही ठिकाणी ताटात इतर काही नसतं, केवळ भातच असतो. कारण रोज नुसता भात खाणं, सांभार भात खाणं ही खाण्याची पध्दत आपल्याकडे अनेक राज्यात रुढ आहे. पटकन, विनासायास होणारा भात हा केवळ प्रमुख अन्न नसून आवडीचा पदार्थ देखील आहे. कंटाळा आला आज भातावर जेवण साजरं करु असं म्हणण्याइतपत भातावर विश्वास टाकला जातो, तो आवडीने खाल्ला जातो. पचायला सहज, पटकन होणारा, कशासोबतही छान लागणारा सोबत आरोग्यदायी असं बिरुद मिरवणारा हाच भात आरोग्यास घातकही असतो, असं एक अभ्यास सांगतो.

Image: Google

आज अन्नपदार्थ, फळं , भाज्या यामधे मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक आढळतात. कळत नकळत हे घटक पोटात जाऊन पोट आणि एकूणच आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. हे सत्य आपण आवडीने खात असलेल्या भातालाही लागू पडतं. अभ्यासक सांगतात की, भात नीट शिजला नाही, तांदूळ शिजवताना कच्चेच राहिले तर मात्र असा भात खाऊन कॅन्सरचा धोकाही उद्भ्भवतो. म्हणूनच अभ्यासक म्हणतात, भात खाऊन आरोग्याची हानी होवू द्यायची नसल्यास भात व्यवस्थित शिजेल याची काळजी घ्यावी. आणि भात थोडाही कच्चा राहाणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं.

Image: Google

काय म्हणतो अभ्यास?

इंग्लडमधील ‘क्वीन युनिव्हर्सिटी’ने एक अभ्यास केला. हा अभ्यास सांगतो की, मातीत असलेले औद्योगिक विषारी घटक आणि कीटकनाशकांमधील रसायन हे तांदळात असण्याची शक्यता सध्या कैकपटीने वाढली आहे. अशा रासायनिक घटकांनी दूषित तांदळाचा भात खाल्ल्यास आर्सेनिक या विषारी घटकाची बाधा होते. तांदळात विषारी घटक असतात हे फक्त हाच एक अभ्यास सांगतो असं नाही. तर अनेक अभ्यासकांनी तांदळातील रासायनिक घटकांचे निष्कर्ष मांडले आहेत. हे अभ्यास सांगतात की, आपल्याला प्रिय असणारा भात हा कॅन्सरला कारणीभूत ठरु शकतो. कॅलिफोर्नियामधे तांदळावर केलेल्या अभ्यासात काही महिलांना समाविष्ट केलं गेलं. हा अभ्यास महिलांना होणारे कॅन्सर, स्तन कॅन्सर , त्याच्याशी निगडित धोका याबद्दलचा होता. या अभ्यासात 9400 महिलांमधे स्तनाचा आणि फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचं आढळून आलं. त्याला कारणीभूत ठरला तो तांदळातला आर्सेनिक हा घटक.

अभ्यासक सांगतात की, आर्सेनिक हे खनिजात असलेलं एक रसायन आहे. या घटकाचा उपयोग किटकनाशकांमधे होतो. तसेच अनेक देशात जमिनितील पाण्यात आर्सेनिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अन्न किंवा पाणी यांच्याद्वारे हे घटक आपल्या शरीरात जातात आणि उलट्या, पोटदुखी, डायरिया, कॅन्सरसारखे आजार होतात. अभ्यास सांगतो की सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या अनेक भागातील तांदळात आर्सेनिकचं प्रमाण आढळतं. तांदूळ जर नीट शिजवून खाल्ला नाही तर शिजवलेल्या भातातही हे घटक शिल्लक राहातत आणि आपल्या आरोग्यास धोका निर्माण करतात. पण म्हणून आपल्याला आवडणारा, आहारातला मुख्य घटक असणारा भात सोडण्याची गरज नाही. अभ्यासक धोका टाळून भात खाण्याचा सोपा उपायही सांगतात. 

Image: Google

तांदूळ शिजवताना..

तांदळात आढळणारा आर्सेनिक हा घटक भाताद्वारे आपल्या पोटात जाऊ नये यासाठी भात करण्यापूर्वी तांदूळ केवळ तीन पाण्यात धुवून घेणंच पुरेसं नसतं. तर तांदूळ पाण्यात भिजत घालणंही महत्त्वाचं असतं. तांदळातील आर्सेनिकचा पूर्ण निचरा होण्यासाठी सकाळी भात करायचा असेल तर रात्री तांदूळ भिजवणं गरजेचं आहे. क्वीन्स युनिर्व्हसिटी बेलफास्टने केलेला अभ्यास सांगतो की रात्री तांदूळ भिजत घालून सकाळी त्याचा भात केला तर यामुळे तांदळातील आर्सेनिक घटक 80 टक्के कमी होतात. या निष्कर्षापर्यंत पोहोचताना त्यांनी काही प्रयोगही केले. त्यातला एक प्रयोग म्हणजे दोन भाग पाणी आणि एक भाग तांदूळ घेऊन तो शिजवला गेला. दुसर्‍या पध्दतीत पाच भाग पाणी आणि एक भाग पाणी घेतलं. भात शिजताना त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकलं असता भातामधील आर्सेनिक घटक निम्म्यावर आलेला आढळला.

Image: Google

जर खूपच घाई असेल आणि भात जेवणात हवा असेल तर अशा वेळेस तो कमीत कमी तीन ते पाच तास भिजवायलाच हवेत. अशा प्रकारे तांदूळ धुवून, भिजत घातल्याने तांदळातले आर्सेनिक सारखे विषारी घटक निघून जातात. अशा तांदळाचा भात खाण्यास सुरक्षित ठरतो.