Join us   

आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात आंघोळीची वेळही तितकीच महत्त्वाची, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 3:02 PM

Right Way and Time To Take Bath According to Ayurveda : आयुर्वेदानुसार आंघोळीच्या बाबतीत काही नियम पाळले तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परीणाम होतो.

आंघोळ ही आपल्या दिवसभराच्या क्रियांमधील एक महत्त्वाची क्रिया आहे. शरीर, मन शुद्ध करण्याचं काम करणारी ही आंघोळ झाल्याशिवाय आपल्याला फ्रेश झाल्यासारखेच वाटत नाही. आपण रोज सकाळी आंघोळ करतो पण ती करण्याची वेळ आणि पद्धत याकडे आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही. आंघोळ म्हणजे काहींसाठी साफसफाई, काहींसाठी सकाळचं एक काम तर काहींसाठी शुद्ध होण्याची क्रिया असते. पण ते करण्याचंही काही शास्त्र, काही पद्धत असते हे लक्षात घ्यायला हवं (Right Way and Time To Take Bath According to Ayurveda).

प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहोली याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात. आयुर्वेदानुसार आंघोळीच्या बाबतीत काही नियम पाळले तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परीणाम होतो. यासाठी आंघोळीची वेळ, पाण्याचे तापमान, कोणत्या वेळेला आंघोळ करणे टाळावे याविषयी त्या अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करतात. पाहूयात त्या कोणते महत्त्वपूर्ण नियम सांगतात...

(Image : Google)

आंघोळीसाठी योग्य वेळ कोणती? 

आपण साधारणपणे सकाळीच आंघोळ करतो. पण त्यातही सकाळी व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ करायला हवी. काही जण व्यायाम करुन येतात आणि मग त्यांना खूप भूक लागते. अशावेळी ते आधी नाश्ता करतात आणि मग आंघोळ करतात. पण असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. कारण यामुळे पचनक्रियेवर विपरीत परीणाम होतो. 

पाण्याचे तापमान किती असावे? 

अनेकांना वर्षभर गार पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. ते अतिशय अभिमानाने आम्ही कायम गार पाण्याने आंघोळ करतो असे सांगतातही. तर काही जण खूप जास्त प्रमाणात गरम पाणी घेतात. या दोन्हीचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. रोजच्या आंघोळीसाठी पाणी खूप गरम आणि खूप गार असू नये. तर कोमट पाण्याने आंघोळ करणे केव्हाही जास्त चांगले. तसेच डोक्यावरुन आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर शक्यतो टाळावा. 

आंघोळ कधी करु नये? 

आयुर्वेदानुसार तुम्हाला ताप असेल, कान दुखत असले किंवा डायरीया म्हणजेच जुलाब झाले असतील तर शक्यतो आंघोळ करु नये. अशावेळी जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही तोपर्यंत आंघोळ करु नये. आंघोळ ही काही प्रमाणात थकवणारी क्रिया असून या आजारांमध्ये आधीच थकवा आलेला असतो आणि आंघोळीने तो वाढण्याची शक्यता असते.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलघरगुती उपाय