डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई
बदलते हवामान आणि वाढते प्रदूषण यांमुळे मोठ्या शहरांमधील ॲलर्जिक अस्थमा आणि श्वसनाशी निगडीत समस्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. छाती भरल्यासारखी वाटणे, नाक वाहणे आणि सतत कफ होणे ही याची काही सामान्य लक्षणे आहेत.
वाढत्या प्रदूषणाचा लहान मुलांवर आणि नागरीकांवर होणारा परीणाम
मुंबई हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या यादीत मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रदूषणाचा मानवी जीवनावर विपरीत परीणाम होत असल्याचे दिसते. टॉक्सिक गॅसेस, धूळ, धूर आणि धुलीकण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे हवेत पसरत असल्याचे दिसते. साधारणपणे श्वसनावाटे आपल्या शरीरात हवेतील प्रदूषणाचा शिरकाव होतो. नाकामध्ये असलेल्या फिल्टरद्वारे ते गाळले जातात. पण सध्या हवेत असलेले प्रदूषित कण अतिशय लहान आकाराचे असल्याने ते नाकावाटे थेट आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत (Rising pollution and health impact How to Prevent allergic asthma).
लहान मुलांवर याचा काय परीणाम होतो?
लहान मुलांना कोरडा कफ होणे, ताप येणे यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. प्रदूषित कण श्वसनमार्गात अडथळा निर्माण करुन श्वसनक्रिया बिघडते आणि घशाला सूज येते. मुलांना अशाप्रकारे घशाला सूज येते तेव्हा कोरडा कफ होतो आणि शिका येतात. याचीच पुढची पायरी म्हणजे काही मुलांना यानंतर काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी ॲलर्जिक अस्थमा होण्याची शक्यता असते. असे झाल्यास फॅमिली फिजिशियन किंवा छातीविकारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असते. मुलांच्या लक्षणानुसार डॉक्टर काही चाचण्या सांगतात किंवा लक्षणे कमी होण्यासाठी औषधोपचार सांगतात.
मुलांची काय काळजी घ्यायला हवी?
१. मुलांना कफ किंवा सर्दी असेल तर शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. बाहेरील वातावरणामुळे हा आजार आहे त्याहून जास्त बळावू शकतो.
२. शाळेत किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी बाहेर जायचेच असेल तर सर्दी झालेल्या मुलांनी चेहऱ्यावर मास्क लावावे. मास्क चांगले असेल तर बाहेरील धुळीकण नाकात जाण्यापासून संरक्षण होऊ शकते.
३. मूल आजारी असेल तर त्याची श्वसनक्रिया सुरळीत आहे ना याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
४. घरातील हवा स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, बाहेर जास्त प्रमाणात ट्राफिक असते त्यावेळी घराची दारे आणि खिडक्या बंद ठेवा. घरात हवा येताना फिल्टर व्हावी यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.
५. ॲलर्जी आणि कफ यांसाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या.
६. वाफ घेण्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होईल त्यामुळे सर्दी-कफ असेल तर अवश्य वाफ घ्या. योग्य काळजी घेतली तर ॲलर्जिक अस्थमा टाळता येऊ शकतो, बराही होतो.
(लेखक मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस आणि श्वसनविकार तज्ज्ञ आहेत.)