डॉ. देविका दामले
डायबिटीस ही काहीशी गुंतागुंतीची समस्या आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या रक्तातील साखर वाढत जाते तेव्हा त्याचा आपल्या शरीराच्या सर्व अवयवांवर परीणाम होतो. डोळे हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव असून डोळ्यांवरही डायबिटीसचा परीणाम होतो. डायबिटीस असलेल्या रुग्णांची शुगर नियंत्रणात असेल तर ठिक आहे अन्यथा डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. डायबिटीक रेटीनोपॅथी ही यातीलच एक महत्त्वाची समस्या असून त्याबद्दल समजून घेणे महत्त्वाचे आहे (Risk Of Diabetic Retinopathy To Diabetic Patients).
डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
१) रेटिना म्हणजे काय?
आपण डोळ्याला कॅमेरा समजले, तर रेटिना अथवा नेत्रपटल म्हणजे कॅमेरातील फिल्मचे काम करतो. आपल्या डोळ्यांवर पडणारे प्रकाशकिरण नेत्रपटलावर पडतात व ते किरण आपल्या मेंदूला डोळ्यांच्या नसेमार्फत पोहोचवले जातात ज्यामुळे आपल्याला दिसू शकते. आपल्या डोळ्यांच्या आतील भागात या रेटिनाचे अतिशय पातळ असे आवरण असते जे आपल्या दृष्टी प्रदान करते. या पडद्यातील मध्यभाग हा आपल्या दृष्टीसाठी सर्वात जास्त संवेदनशील भाग असतो ज्याला 'मॅक्युला' असं म्हणतात.
२) डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?
रेटिनाच्या संरचनेत रक्तवाहिन्यांमधे मधुमेहामुळे जे दुष्परिणाम होतात त्या व्याधींना एकत्रितपणे डायबेटिक रेटिनोपथी म्हटले जाते.
३) कोणात्या रुग्णांना डायबेटिक रेटिनोपथी होऊ शकते?
सर्व मधुमेहींना हा आजार होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे जे लोक दीर्घ कालावधीपासून मधुमेही आहेत व ज्यांची रक्तशर्करा पातळी अनियंत्रित आहे त्यांना रेटिनोपथी होण्याचा धोका असतो. मधुमेह असणाऱ्या ३०% रुग्णांमध्ये रेटिनोपथी आढळून येते. मधुमेहाचा कालावधी १० वर्षापेक्षा जास्त असेल तर हे प्रमाण ७० ते ९०% पर्यंत वाढते आणि २० वर्षापेक्षा जास्त काळ मधुमेह असणाऱ्या ९५% रुग्णांमध्ये रेटिनोपॅथीची समस्या आढळून येते. जर मधुमेहासोबत ब्लडप्रेशर, हृदयविकार, किडनी विकार कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण असेल तर हाच संभाव्य धोका अजून वाढतो.
डायबिटीस आहे? शुगर वाढतेय? डोळ्यांची तपासणी केली का? तज्ज्ञ सांगतात, शुगर असेल तर..
४) डायबेटिक रेटिनोपथीमध्ये डोळ्यांना काय होते?
मधुमेहींमध्ये रक्तशर्करेच्या जास्त प्रमाणामुळे शरिरातील सर्व रक्तवाहिन्यांवर प्रभाव पडतो. रक्तवाहिन्या खराब होऊन कमकुवत होत जातात. अशीच रेटिनाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधे खराबी निर्माण होऊन त्या कमकुवत होऊन फुटतात व पडद्यावर रक्तस्राव होतो. रक्ताचे डाग पडतात व सूज येते. तसेच कमकुवत रक्तवाहिन्यांमधून प्रथिने पडद्यावर साचून पिवळे डाग पडतात.
५) डोळ्यांच्या आत रक्तस्राव का होतो?
रेटिनाच्या रक्तवाहिन्या खराब असल्याने त्या पूर्ण रेटिनाला पुरेसा रक्तपुरवठा व ऑक्सिजन पुरवठा करु शकत नाहीत. त्यामुळे रेटिनावर नवीन रक्तवाहिन्यांचे जाळे तयार व्हायला लागते. या नवीन रक्तवाहिन्या अतिसूक्ष्म असतात व त्यामुळे अजूनच जास्त कमजोर असतात. त्यामुळे त्या फुटून त्यातून डोळ्यांच्या आतल्या भागात तसेच रेटिनावर रक्तस्राव होतो. रेटिनावर जाळया निर्माण होणे (Fibrovascular proliteration)हा देखील मधुमेहातील एक दोष आहे ज्यामुळे रेटिनावर ताण पडून रेटिना आपल्या जागेवरून खेचला जाऊन निसटू शकतो व रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
लेखिका नेत्रतज्ज्ञ आहेत.
devikadamle@gmail.com