Join us   

पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन चटकन होण्याचा धोका, आहारतज्ज्ञ सांगतात ५ उपाय...वाढवा प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 3:57 PM

आजारी पडल्यावर आहार आणि विहारात लहान बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो...

ठळक मुद्दे पावसाळ्यात वेगवेगळ्या इन्फेक्शनचा सामना करावा लागू नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याविषयीपावसाळ्यात आजारांपासून दूर होण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खास उपाय...

पावसाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यात जास्त चिंता वाटते ती तब्येतीची. हवेत असणारा गारवा, ओलाव्यामुळे होणारी डासांची पैदास आणि ते चावल्याने होणारे डेंगी, मलेरीयासारखे आजार तसेच पाण्यातून होणारे विविध इन्फेक्शन आणि इतर आजार. या सगळ्यापासून सुरक्षित राहायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. आता कुठे कोरोनाचे संकट थोडे कमी व्हायला लागले असताना पावसामुळे इतर नेहमी होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होतेच. अशावेळी लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांची जास्त काळजी घ्यावी लागते. 

(Image : Google)

उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली अंगीकारली तर मात्र आपल्याला घाबरायचे कारण नाही. मात्र पावसाच्या काळात प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर पावसाळ्यात वेगवेगळ्या इन्फेक्शनचा सामना करावा लागू नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याविषयी मार्गदर्शन करतात. ऋजूता दिवेकर सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टीव्ह असून त्या आपल्या चाहत्यांना डाएटविषयी नेहमी काही ना काही सांगायचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीपासून कोणते पदार्थ आहारात घ्यायला हवेत याविषयी त्यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. हे उपाय कोणते ते पाहूया...

१. गुलकंद 

गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा गुलकंद उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंद खाण्यास सांगितले जाते. गुलकंद चवीला गोड असल्याने अॅसिडीटी, अपचन आणि अशक्तपणा यासाठी नियमित एक चमचा गुलकंद खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या डेंगी, मलेरीया यांसारख्या आजारांपासून संरक्षणासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. 

२. घरगुती काढा 

१ ग्लास पाणी, १ ग्लास दूध, चिमूटभर हळद आणि २ ते  ३ काड्या केशर चांगले उकळून घ्या. उकळल्यावर यामध्ये जायफळ पावडर आणि चवीपुरता गूळ घाला. हे मिश्रण गार झाल्यावर किंवा गरम असतानाच घ्या. यामुळे दाह होत असेल तर तो कमी होण्यास मदत होईल.

(Image : Google)

३. तांदळाची पेज 

तांदळाच्या कण्यांपासून केलेली पेज किंवा कांजी पावसाळ्याच्या काळात अतिशय उपयुक्त असते. भरूपर पाणी घालून केलेली ही पातळसर पेज सैंधव मीठ, हिंग आणि तूप घालून गरमागरम प्यायला हवी. यामुळे जुलाबामुळे डिहायड्रेशनचा त्रास झाला असेल तर तो कमी होण्यास मदत होईल. इतकेच नाही तर पचनशक्ती सुधारण्यास याची चांगली मदत होईल आणि इलेक्ट्रोलाइटस कमी झाले असतील तर ताकद भरुन काढण्यास पेज उपयुक्त ठरेल.

४. पाणी 

आजारी पडल्यावर पाणी भरपूर प्यायला हवे. त्यामुळे लघवीचे प्रमाण चांगले राहील आणि तब्येत लवकर बरी होण्यास मदत होईल. लघवीचा रंग पांढरा स्वच्छ असेल याची काळजी घ्या. जास्त पाणी प्यायल्यास लघवी चांगली होण्यास मदत होते.  

५. सुप्त बद्धकोनासन

पडल्या पडल्या करता येईल असे हे आसन आजारपणात जरुर करावे. यामुळे अंगदुखी, शरीरावर आलेला ताण निघून जाण्यास मदत होते. हे आसन करताना पाठ आणि मानेला चांगला सपोर्ट द्यायला हवा. यामुळे पाठदुखी होत असेल तरी ती कमी होण्यास मदत होते. करायला सोपे पण फायदेशीर असलेल्या या आसनाचा चांगला फायदा होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससंसर्गजन्य रोग