Join us   

दिवाळीत अभ्यंगस्नान का करायचे? अभ्यंग स्नानाचे फायदे, वर्षभर तब्येत ठणठणीत ठेवायची तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 6:00 PM

Scientific Importance of Abhyang In Diwali : दिवाळीच्या निमित्ताने आपण याची सुरुवात करत असलो तरी थंडीच्या काळात शक्य तितक्या वेळा अभ्यंग स्नान करायला हवे.

दिवाळी आली की आपल्याला ज्याप्रमाणे फराळाचे, नवीन कपड्यांचे, फटाक्यांचे वेध लागतात त्याचप्रमाणे अभ्यंग स्नान हाही दिवाळीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीच्या गिवसांत आजही घरोघरी अभ्यंग स्नान केले जाते. पहाटे लवकर उठून अंगाला तेलाने मसाज करुन उटणे लावून स्नान करणे म्हणजे अभ्यंग स्नान. या गोष्टीला धार्मिक महत्त्व असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणे आहेत जी आपल्या आरोग्याशी जोडलेली आहेत. आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचे अनेक फायदे सांगितले असून थंडीच्या काळात शरीर, मन आणि त्वचा यांच्यासाठी हे स्नान अतिशय महत्त्वाचे असते. दिवाळीच्या निमित्ताने आपण याची सुरुवात करत असलो तरी थंडीच्या काळात शक्य तितक्या वेळा अभ्यंग स्नान करायला हवे (Scientific Importance of Abhyang In Diwali). 

(Image : Google )

अभ्यंग करण्यामागे शास्त्रीय महत्त्व काय? 

पावसाळा आणि त्यानंतर येणारी ऑक्टोबर हिट संपून थंडी चालू होण्याचा कालावधी म्हणजे थंडीचा ऋतू. थंडीत ऐन दिवाळीत पडत असल्याने दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. शिशिरात थंडीची तीव्रता खूप जास्त असते. थंडी सुरु होते, वाढत जाते तसतसं हवामान बदलत जातं. नुसती थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो. हवेत कोरडेपणा वाढतो तसाच तो आपल्या शरीरात आणि त्वचेतही वाढतो. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराला द्रव पदार्थ आणि पाण्याची जास्त प्रमाणात गरज असते त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडत असल्याने आपल्या आहारविहारात बदल करणं अपेक्षित असतं. 

(Image : Google )

त्वचेचा कोरडेपणा कमी करणं आणि त्याची स्निग्धता वाढवण्यासाठी त्वचेला अभ्यंगाची गरज असते. म्हणूनच अभ्यंग स्नानात त्वचेला खोबऱ्याच्या, तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केला जातो. हे तेल अंगात मुरले की त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते. उटण्यातील औषधी वनस्पती त्वचेसाठी उपयुक्त असतात. तेल लावून उटण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या कोरडेपणा तर कमी होतोच पण त्वचेला खाज येणं, पुरळ, रॅशेस हे त्रास कमी होण्यासही मदत होते.  

टॅग्स : दिवाळी 2023दिवाळीतील पूजा विधीत्वचेची काळजीआरोग्य