भारतात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे ३ ऋतू आहेत तसे जगात इतरत्र कुठेच नाहीत. त्यामुळे आपला देश हवामानाच्या बाबतीत समृद्ध आहे असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षात ऋतूमान बिघडत असल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. इतकेच नाही तर ऋतू बदलतो तेव्हाही आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतात. एका ऋतुतून दुसऱ्या ऋतूत जाताना व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-खोकला, ताप किंवा इतर काही तक्रारी उद्भवत असल्याचे आपण पाहतो (Season change diet tips by dietitian rujuta divekar).
लहान मुलांना आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर ऋतूबदलाचा हमखास त्रास होतोच. पण असे सतत आजारी पडू नये आणि तब्येत कायम ठणठणीत राहावी यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. त्या त्या सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या गोष्टी आवर्जून खायला हव्यात असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर कायमच सांगतात. आताही ऋतूबदल होताना आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याविषयी त्या काय सांगतात, पाहूया...
१. बाजरी
बाजरी हे आपल्याकडे सहज मिळणारे पारंपरिक धान्य आहे. या बाजरीची आपण खिचडी, भाकरी, उकड असे काहीही करु शकतो. पण ते योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे बाजरीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
२. खारीक
जाता येता खारीक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. खारकेमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते तसेच त्वचेशी निगडीत तक्रारी, केसगळती यांसारख्या समस्यांवर खारीक फायदेशीर ठरते. बाळंतपणानंतर भरपूर दूध येण्यासाठीही आहारात खारकेचा समावेश करावा.
३. लोणचं
मोहरी घातलेलं लोणचं हे आपल्या आहारात असायलाच हवे. लोणच्यामध्ये मोहरीची डाळ फेटून घातली जाते. मोहरीमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटस भरपूर प्रमाणात असतात. तसेच लोणचं ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्याने ते आहारात आवर्जून असायला हवी.