सध्याच्या काळात आपल्यापैकी बरेचजण बैठी जीवनशैली या पद्धतीचा वापर करत आहेत. तंत्रज्ञानातील प्रगतीने असे वातावरण तयार केले आहे, जे अधिक बसून आणि कमी हालचाल करण्यास प्रोत्साहन देते. यामुळे ऑफिसचे काम, शाळा - कॉलेज, टीव्ही पहाणे, कार, बस, लिफ्ट यांसारखी अनेक काम करत असताना आपण ती बसूनच करतो. दिवसभरात अशी अनेक कामे आहेत जी आपण तासंतास एकाच जागेवर बसून करतो. एकाच जागेवर बसून राहिल्याने आपल्या शरीराची हालचाल फारच कमी प्रमाणात होते. परिणामी, बैठ्या जीवनशैलीमुळे स्थूलपणा, हृदयविकार आणि मधुमेहासारखे विकार जडतात. ही बदललेली जीवनशैली आपल्या आरोग्याला घातक ठरु शकते. सेडेंटरी (Sedentary Lifestyle) म्हणजे बैठी किंवा निष्क्रिय जीवनशैली धोकादायक असते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे जीवघेण्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामध्ये तिने आपल्या चुकीच्या जीवनशैलीवर भाष्य केलं आहे. तुम्ही कितीही व्यायाम केले, डाएट केले, योगा केला तरीही शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. कारण तुम्ही केलेली ही एक चूक लठ्ठपणाला जबाबदार ठरते आणि ती म्हणजे बैठी जीवनशैली (Sedentary Lifestyle). ऋजुता दिवेकरने आपल्या पोस्टमध्ये ८ महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. तुमचं रूटीन कितीही व्यस्त असले तरीही ८ गोष्टी न चुकता फॉलो केल्या तरच तुम्हाला लठ्ठपणाला सामोरे जावे लागणार नाही. अगदी रोजच्या रुटीनमध्ये या ८ गोष्टी करा आणि लठ्ठपणाला दूर करा असा सल्ला ती देताना दिसत आहे(Sedentary lifestyle? Rujuta Diwekar on easy ways to sit less and move more).
नेमक्या कोणत्या आहेत त्या ८ महत्वाच्या टिप्स ?
१. सलग ३० मिनिटे एकाच जागेवर बसून राहिल्यानंतर ३ मिनिटे उभे राहा. उभे राहून आपल्या शरीराची थोडी हालचाल करावी. अनेकदा आपल्यापैकी अनेकांच काम हे बसून असते. अशावेळी अगदी ३० मिनिटे नाही पण हातातील काम झाल्यावर उठणं अतिशय गरजेचे आहे.
२. ३० मिनिटानंतर ३ मिनिटे उभे राहावे. आपले हातांतील काम झाल्यावर पाय मोकळे करण्यासाठी चालणे झाले नाही तरी चालेल परंतु आपल्या दोन्ही पायांवर एक समान वजन देऊन व्यवस्थित विश्राम स्थितीत उभे रहावे. उभे राहताना देखील एक नियम आवर्जून पाळा. दोन्ही पायांवर समान वजन देऊन उभे राहा. एका बाजूला झुकून उभे राहू नका.
३. चालण्याचा व्यायाम हा आपल्या शरीराला कायमच फायदेशीर ठरतो. अशावेळी तुम्ही ऑफिसला किंवा घरी जाताना - येताना जिने चढण्याचा पर्याय निवडा. रोज किमान ४ मजले चढले - उतरले पाहिजे.
४. तुम्ही जर तुमचे स्वतःचे वाहन घेऊन ऑफिसला जात असाल तर आपली गाडी दूर पार्क करून चालण्याचा पर्याय निवडा. कमी अंतराच्या ठिकाणी गाडी न नेता चालत जाण्याची सवय करा. आपले ऑफिस आणि गाडी पार्क करण्याचे ठिकाण यामध्ये किमान ५०० पावलांचे अंतर ठेवून, मगच त्या ठिकाणी गाडी पार्क करावी. जेणेकरून ऑफिसपासून, गाडी जिथे पार्क केली आहे तिथे येईपर्यंत तुमची ५०० पावल न कळत चालून होतील अशा प्रकारे तुमचा व्यायाम होईल.
५. आठवड्यातून एक दिवस वेगळा स्वतःसाठी राखून ठेवा. अशावेळी मुलांना पार्क, गार्डन किंवा इतर ऍक्टिविटी करण्यासाठी घेऊन जा. मुलांना नातेवाईक किंवा मोकळे वातावरण असलेल्या ठिकाणी घेऊन जात जा. यामुळे तुमच्या शरीराची थोडीशी हालचालही होईल तसेच आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी संपर्कात आल्यामुळे आपली ओळख वाढेल व तुमच्या नात्यातील बंध अजून चांगले होण्यास मदत होईल.
६. आठवड्यातील एक दिवस असा ठरवा की त्या दिवशी घरातील एकही व्यक्ती गॅजेट्स किंवा इलेक्ट्रिनिक्स वस्तूंचा वापर करणार नाही. अशावेळी घरातील काही सगळी कामे करण्यासाठी गॅजेट्स किंवा मशिन्सचा वापर करणे संपूर्णपणे टाळावे. उदाहरणार्थ :- कपडे हातांनी धुणे, घरातील भांडी घासणे, घर झाडून - पुसून घेणे. जेणेकरून शरीराची हालचाल होऊ शकते. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
७. घरांतील स्त्रियांसोबतच पुरूषांनी देखील स्वयंपाक बनवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. पुरुषांनी जेवण बनवताना, आपण केवळ डाळ भात किंवा खिचडी बनवू शकता. पंचपक्वान्न बनवण्याची गरज नाही. थोडासा चेंज म्हणून पुरुषांनीदेखील स्वयंपाक केला पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी पोषक वातावरण तयार करणे देखील महत्त्वाचे असते.
८. रात्रीच्या जेवणानंतर १०० पावले अवश्य चाला. यालाच शतपावली करणे असे म्हंटले जाते.
ऋजुता दिवेकर हिच्या मते थोडी - फार शारीरिक हालचाल महत्त्वाचीच...
कदाचित आपल्याला या छोट्या - छोट्या शारीरिक हालचालींचे महत्व माहित नसेल. नवीन परिस्थिती आणि संदर्भांनुसार मानवी शरीराचे कार्य नियमित करण्याच्या मेंदूच्या क्षमतेला चालना देण्याचे काम या छोट्या - छोट्या हालचालींमधूनच होत असते.या हालचालींमुळे वृद्ध लोकांमध्ये, पाठदुखी, मधुमेह, हृदयविकार आणि अगदी नैराश्य टाळण्यास मदत होते. कारण हालचाल ही व्यायामापेक्षा वेगळी असते. त्याला पर्याय नाही.