जानेवारी महिना सुरु झाली की वेध लागतात ते संक्रांत, त्यानंतर होणारं हळदी कुंकू अन रथसप्तमीचे. यासाठी तीळ आवर्जून लागतात. मग किराण्याच्या यादीत तिळाचा समावेश केला जातो. अनेकजणी नेहमी लागते त्यापेक्षा जरा जास्तच तीळ मागवतात. याचं कारण म्हणजे समाज माध्यमांवर होणारी तिळाच्या गुणधर्माची चर्चा. कोणी वजन कमी होण्यासाठी अमूक एक फायदेशीर म्हटलं, की आपल्यासाठीही हे फायदेशीर ठरेल की नाही, की त्याचं काही नुकसान होईल याची खात्री न करता त्याचं सेवन केलं जातं. काही परिणाम दिसले नाही किंवा काही त्रास जाणवायला लागला की तो पदार्थ सोडून दिला जातो. तोपर्यंत नवीन कोणत्यातरी घटकाची सोशल मीडियावर चर्चा सुरु होते आणि तो मग तो पदार्थ आहारात समाविष्ट केला जातो. तसंच अगदी तिळाच्या बाबतीत होत असल्यानं त्याबाबत तज्ज्ञांनी तीळ जपून, मोजून मापून, सोसेल इतकीच खाण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य अपर्णा पद्मनाभन यांनी आपल्या क्लिनिकमधलं उदाहरण देऊन तीळ जास्त सेवन करण्याचे तोटे सांगितले आहे. सोबतच किती प्रमाणात तीळ खाल्ल्यास ती फायदेशीर ठरेल याबाबतीतही मार्गदर्शन केलं आहे.
Image: Google
तिळाचं अति प्रमाणात सेवन केल्यास
अति प्रमाणात तीळ खाल्ल्यास काय होतं हे वैद्य अपर्णा यांनी आपल्या क्लिनिकमधे आलेल्या दोन महिला रुग्णांच्या उदाहरणावरुन दिलं. त्या म्हणतात माझ्याकडे आलेल्या एका महिला रुग्णास अचानक शरीरात खूप उष्णता वाढल्याचा त्रास होवू लागला होता. तर दुसऱ्या महिला रुग्णाला मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होण्याचा त्रास सुरु झाला होता.
असं का होत असेल याबाबत खोलवर चिकित्सा केली असता वैद्य अपर्णा यांना या महिलांच्या आहारात तिळाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं. एक महिला सोशल मीडियावरील व्हायरल नाभीत तिळाचं तेल घातल्याने होणाऱ्या फायद्यांनी एवढी प्रभावित झाली की ती नाभीत घालत असलेल्या तेलाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे त्या महिलेच्या शरीरातील उष्णता वाढली होती तर दुसरी महिला तीळ सेवन केल्यानं त्वचा छान राहाते, वजन घटतं म्हणून येता जाता तीळ कच्ची खाणं, तिळ-गुळाचे लाडू भरपूर खाणं असं करत होती. त्यामुळे तिला अचानक मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव सुरु झाला.
Image: Google
तिळाचे दुष्परिणाम का होतात?
वैद्य अपर्णा सांगतात, की तिळाच्या अति सेवनामुळे शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढतं. तसेच तिळाचं तेल अति प्रमाणात नाभीत घालणं, कच्चे तीळ खूप खाणं किंवा तिळाचे पदार्थ खाण्याचं प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पित्त आणि कफ यांचा समतोल बिघडतो. त्याचाच परिणाम शरीरात उष्णता वाढणे. मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होण्यावर होतो.
चांगल्या गोष्टींचे शरीरावर - आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी अचानक एखादी गोष्ट आपल्या आहारात किंवा दिनचर्येत समाविष्ट करताना, तिचं आहे ते प्रमाण वाढवताना आधी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा असं वैद्य अपर्णा सांगतात.
Image: Google
किती तीळ खाणं योग्य?
वैद्य अपर्णा सांगतात, की जर अति रक्तस्त्राव होत असल्याची समस्या मुळातच असेल, त्वचेसंबंधी काही समस्या असतील , पोटात जंत होत असतील तर तिळाचं सेवन प्रमाणात करावं. दिवसभरात 5 ग्रॅम तिळाचं सेवन योग्य ठरतं. यापेक्षा जास्त तिळ खावी असं कुठे वाचलं असेल, कोणी सांगितलं असेल तर आधी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तिळाचं तेल अंगास लावणं उत्तमच. पण आपल्या प्रकृतीनुसार आठवड्यातून तिळाचं तेल किती वेळा लावायला हवं, ते गरम करुन लावावं की कोमट. आंघोळीच्या आधी की झोपण्याआधी हे डाॅक्टरांकडून समजून घेवूनच ठरवावं.
Image: Google
तसेच आपली मैत्रिण तर एवढी तीळ रोज खाते, तिला काही त्रास होत नाही, मग मलाच का? तर याचं उत्तर म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक् गोष्ट सगळ्यांना सारख्याच प्रमाणात फायदा देईल असं नाही. एखाद्या गोष्टीचा एकाला लाभ होत असेल तर द्सऱ्याला तोटाही होवू शकतो. कारण प्रकृती. म्हणूनच वैद्य अपर्णा केवळ तिळाच्याच बाबतीत नाही तर इतर कोणत्याही बाबतीत आहारात आणि आपल्या दिनचर्येत कुणाचं अनुकरण न करण्याचा सल्ला आवर्जून देतात.