वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट कायम चर्चेत असतात. पण डाएट म्हटलं की त्याचा संबंध फक्त वजनाशीच असतो असं नाही. सौंदर्य समस्या असतील, काही विशिष्ट आजार असतील तरीसुध्दा विशिष्ट प्रकारचं डाएट पाळावं लागतं. पण डाएटकडे वेटलॉस आणि वेटगेन एवढ्याच मर्यादित अर्थानं पाहिलं गेल्यामुळे अभिनेत्री शमिता शेट्टी हिच्या ‘ग्लूटेन फ्री डाएट’चा संबंधही अनेकांनी वजन कमी होण्याशी, फिटनेसशी जोडला. पण शमिता शेट्टीचं हे ग्लूटेन फ्री डाएट वजन कमी करण्यासाठी नाहीये. बिग बॉसच्या 15 व्या सिझनमधली स्पर्धक असलेली शमिता शेट्टी तिथे खाण्याची वेळ आली की नाक मुरडायची. मला अमूक नको, तमूकच हवं. हे नाही चालणार तेच हवं असं म्हणायची. इतर स्पर्धकांना शमिता ही खाण्यापिण्याच्या बाबतीत फारच नखरे करतेय असं वाटायला लागलं. काहींना तिचा तो अँटिट्यूड वाटू लागला. एका स्पर्धकानं तर यावरुन तिच्याशी भांडणही केलं. तेव्हा चिडलेल्या शमितानं आपल्याला असलेल्या आजाराचा आणि तिच्या डाएटचा खुलासा केला. आपल्याला कोलायटिस असल्यामुळे आपण ग्लूटेन फ्री डाएट घेतो असं शमितानं उलगडून सांगितल्यावर वाद थांबला. पण मग प्रसारमाध्यमातून, सोशल मीडियावरुन शमिता शेट्टीच्या ग्लुटेन फ्री डाएटची चर्चा व्हायला लागली.
Image: Google
शमिताचा कोलायटिस
शमिता शेट्टीला कित्येक वर्षांपासून ‘कोलायटिस’चा त्रास होतोय. कोलायटिस या त्रासात आतड्याला सूज येते. यामुळे पचन व्यवस्थेला सूज आणि जखमा देखील होतात. कोलायटिसमधे पोटात कळा येणं, पोटात असह्य वेदना होणं, थंडी वाजणं, ताप येणं, रक्ताचे जुलाब होणे असे त्रास होतात. या त्रासाचं स्वरुप आणि औषधांचा होणारा परिणाम बघता डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ ग्लूटेन फ्री डाएटचा सल्ला देतात.
Image: Google
काय असतं हे ग्लूटेन फ्री डाएट?
तज्ज्ञ सांगतात की अल्सरेटिव्ह कोलायटिस प्रकारात रुग्णांना ग्लूटेन या आहार घटकाची अँलर्जी असते. ही समस्या सध्या अनेक लोकांमधे पाहायला मिळते. आतड्यांच्या दाहाशी संबंधित आजार असलेले एकूण 65 टक्के रुग्णांना ग्लुटेन फ्री डाएट घेतल्याने बरं वाटतं, असं तज्ज्ञ सांगतात.
बंगलोरमधील ‘एस्टर सीएमआई हॉस्पिटल’मधील जेष्ठ आहार तज्ज्ञ एडविन राज सांगतात की ग्लूटेन हे एक प्रथिनं आहे. जे गहू, राळे,ओटस यासारख्या पदार्थांमधे प्रामुख्याने असतं. अनेक जण तज्ज्ञांचा सल्ला न घेताच आपल्याला अमूक त्रास होतोय ना मग आपण ग्लूटेन फ्री डाएट सुरु करु असं म्हणून ग्लुटेन डाएट करतात . एडविन यांच्या मते हे पूृर्णत: चुकीचं आहे. डॉक्टरांच्या, आहार तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय ग्लूटेन डाएट सुरु केल्यास त्याने आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण होतात.
गुरुग्राम येथील ‘मणिपाल हॉस्पिटल’च्या आहार विभागप्रमुख डॉ. शलिनी ब्लिस सांगतात की, ज्यांना सीलिएक आजार असतो, म्हणजेच छोट्या आतड्याला सूज आल्यानं आतडे अन्नातील पोषक घटक शोषून घेण्यास असमर्थ ठरतात. खास असा त्रास असणार्या रुग्णांसाठी ग्लुटेन फ्री डाएट असतं. कारण या रुग्णांना अन्नपदार्थातील ग्लूटेनची अँलर्जी असते. अल्सरेटिव कोलायटिस हा आजार असेल आणि त्याचा त्रास औषधांनी नियंत्रणात येत नसेल तर डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ रुग्णाला ग्लूटेन फ्री डाएट घेण्याचा सल्ला देतात.
Image: Google
ग्लूटेन फ्री डाएटचेही होतात साइड इफेक्ट
डॉ. शालिनी ब्लिस सांगतात की , सीलिएक आजार असलेल्या रुग्णांसाठी ग्लूटेन फ्री डाएट हे योग्य असतं. ग्लूटेन फ्री डाएट करताना गहू, गव्हाचे पदार्थ आणि ग्लूटेन असलेले इतर पदार्थ खाणं टाळलं जातं. त्याचा परिणाम म्हणून शरीरातील जीवनसत्त्वं आणि खनिजं कमी होतात. तसेच ग्लूटेन फ्री डाएट मधून पचनास मदत करणारे पुरेसे फायबरही मिळत नाही. पण केवळ आजाराची लक्षणं कमी करण्यासाठी हा आहार तज्ज्ञ रुग्णांना घेण्यास सांगतात. त्यामुळे शमिता शेट्टी करते ग्लूटेन फ्री डाएट म्हणून आपणही आंधळेपणानं हे डाएट केलं तर फायदा दूरच राहिला नुकसान मात्र हमखास आहे.