वाढत्या वयात प्रत्येकालाच वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. सेलिब्रिटीसुद्धा या त्रासापासून वाचलेले नाहीत. मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना जीवघेण्या आजारांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. अशात त्यांच्या तब्येतीबाबत काही बिनसल्यास प्रचंड चर्चा होते. सध्या शिल्पा शेट्टीची बहिण शमिता तिच्या आजारामुळे चर्चेत आहे.
एका कार्यक्रमात आपल्याला आजार झाला असल्याचं शमितानं सांगितलं. तिच्या म्हणण्यानुसार शमिता कोलायटिस नावाच्या गंभीर आजारामुळे त्रस्त आहे. यामुळे सामान्य लोक जो आहार घेतात तो आहार शमिता घेऊ शकत नाही. शमिताला झालेला हा आजार नेमका काय आहे? हा आजार कशामुळे होतो? हा आजार होऊ नये म्हणून काय खायचं काय टाळायचं याबाबत माहिती देणार आहोत.
शमिता बहुचर्चित शो बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ती वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. बिगबॉसमध्ये ती खाण्यापिण्याच्या बाबतीत नेहमीच बोलताना दिसते. यावेळी शमितानं आपल्या आजाराबाबत खुलासा करत मी नॉर्मल आहार घेऊ शकत नाही. अन्यथा मला आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात असे सांगितले.
कोलायलिस हा आजार काय आहे?
या पोटाच्या आजाराला इन्फ्लेमेटरी बाउल डिसऑर्डर म्हणून देखील ओळखलं जातं. हा आजार झाल्यास व्यक्तीच्या पोटामधील मोठं आतडं आणि गुदाशयाच्या आतल्या भागामध्ये जळजळ होते, सूज येते. त्यामुळे वेदना जाणवतात. ही सूज गुदाशय आणि मोठ्या आतड्याच्या खालच्या भागापासून येण्यास सुरूवात होते. नंतर संपूर्ण शरीरामध्ये पसरते. कोलायटिसचा पोटामधील छोट्या आतड्यांवर परिणाम होतो. याला इलियम असे म्हणतात.
लक्षणं
कमकुवतपणा, अशक्तपणा जाणवणं, पोटात तीव्रतेनं वेदना, भूक न लागणं, गुदाशयामध्ये वेदना (रेक्टल पेन)गुदाशयामधून रक्तस्त्राव, ताप, वजन कमी होणे, मुलांमध्ये कमकूवतपणा जाणवणे आणि त्यांचा विकास न होणे, शौचास त्रास होणं, थकवा येणं.
आजार टाळण्यासाठी आहार कसा घ्यावा
उकडलेले अन्नपदार्थ खावेत.
प्रोटिन्सयुक्त,फायबर्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश असावा. त्यात अंडी, कमी चरबीयुक्त मास, सर्व धान्य यांचा समावेश असावा.
तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नये.
आहारात जास्तीत जास्त फळं, भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश असावा.
पचण्यास जड असलेले तळलेले पदार्थ, मैदा यांचा आहारात समावेश करू नये.
रात्री जास्त उशीरा जेवू नये, जेवण हळूहळू व्यववस्थित चावून खायला हवं.
धुम्रपान, मद्यपान टाळा.