शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेकदा आहाराची आणि स्वच्छतेची काळजी घेतो, परंतु कधीकधी आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजारी पडू शकतो ज्यामध्ये शूज आणि चप्पलचा देखील समावेश आहे. जर तुम्ही शूज आणि चप्पल व्यवस्थित घातले नाहीत तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुख्यतः घाणेरडे शूज आणि चप्पल घरात बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस पसरण्याचा धोका निर्माण करतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. शूजमुळे तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? हे जाणून घेऊयात...
फंगल इन्फेक्शनचा धोका
घाणेरडी आणि ओली चप्पल किंवा शूज घातल्याने फुट फंगस, एथलीट फुट आणि नेल फंगससारख्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर पायांमध्ये घाम आणि ओलावा असल्याने फंगस लवकर वाढते, ज्यामुळे पायांना खाज सुटणे, जळजळ होणे आणि दुर्गंधी येऊ शकते.
बॅक्टेरियल इन्फेक्शनची समस्या
बाहेरून शूजमधून अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस घरी येऊ शकतात. हे फक्त तुम्हाला आजारी पाडत नाहीत तर ते तुमच्या घरातील लोकांनाही आजारी करू शकतात. ई. कोलाय आणि साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया प्रामुख्याने बुटांमधून घरात प्रवेश करू शकतात. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
मॉल, हॉस्पिटल, शौचालय यासारख्या सार्वजनिक ठिकाणी अनेक प्रकारचे व्हायरस असू शकतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. यामुळे तुम्हाला फ्लूसारखं इन्फेक्शन होऊ शकतं.
शूज घालताना कोणत्या चुका टाळाव्यात?
- बाहेरील शूज घरात आणल्याने बॅक्टेरिया आणि व्हायरसचा धोका वाढतो, घरात शूज घालणं टाळा.
- फंगस इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी शूज स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
- बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट करण्यासाठी शूज आणि चप्पल काही काळ उन्हात ठेवा.
- पायांना घाम येऊ नये म्हणून कॉटनचे मोजे घाला.
- कधीही ओले शूज घालू नका, यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात.