खांदे दुखणे ही अतिशय सामान्य वाटणारी समस्या आहे. अनेकदा सतत काही ना काही काम करुन, कधी तासनतास लॅपटॉपवर बसल्याने किंवा कधी आणखी काही कारणाने आपले खांदे खूप दुखतात. हात, शरीर आणि मान यांना जोडणारा हा भाग कोणत्याही प्रकारचा ताण आला की दुखू शकतो. अनेकदा अंगाखाली आल्याने किंवा सतत बैठ्या कामामुळे आपले खांदे दुखतात अशी आपण स्वत:ची समजूत घालतो. पण तुमचे खांदे सतत दुखत असतील तर हे ४ गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे आपल्या महागात पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच कोणत्याही दुखण्याकडे वेळीच लक्ष देऊन त्यावर उपाय करणे केव्हाही जास्त महत्त्वाचे असते (Shoulder Pain can be sign of 4 Serious Diseases).
खांदा हा शरीरातील सर्वात जास्त हालचाल होणारा अवयव असून तो दुखावला की आपल्याला दैनंदिन काम करणेही अवघड होऊन जाते. हैद्राबादमध्ये असणारे डॉ. आर.ए.पूर्णचंद्र तेजस्वी सांगतात, खांदेदुखी ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४ ते २६ टक्के लोकांना खांदेदुखीची समस्या सतावत असते. डॉ. तेजस्वी म्हणतात, खांदे जास्त जोरात दुखत असतील तर तुम्ही खाद्यांवर खूप जास्त वजन टाकून झोपत आहात हे लक्षात घ्यायला हवे. खांदे हलवायला जास्त त्रास होत असेल तर खांद्यामध्ये फ्रॅक्चर, गाठी किंवा नसा दबल्या गेल्यामुळे हा त्रास असू शकतो. तर हातातील किंवा खांद्यातील ताकद गेली असे वाटत असेल तर लिगामेंटस फाटणे, हाताच्या सांध्यांना इजा यांसारखे काहीतरी असू शकते. सुरुवातीला आपण या दुखण्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात हे दुखणे गंभीर रुप धारण करु शकते.
कोणत्या ४ गंभीर आजारांचे लक्षण?
१. ऑस्टीओ अर्थ्रायटीस - हाडांची ठिसूळता
२. रुमेटाइड अर्थ्रायटीस - हाडांना सूज येणे
३. बर्सायटीस - सांध्यांना सूज येणे
४. हृदयरोग - हृदयाशी संबंधित तक्रारी
उपाय काय?
१. डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार घेणे हा उत्तम उपाय आहे.
२. मेडीकल शॉपमध्ये जाऊन ओव्हर द काऊंटर औषधे घेणे टाळावे.
३. हाताचे आणि खांद्यांचे सोपे व्यायाम करणे हा अतिशय सोपा आणि चांगला उपाय आहे.
४. खांद्यांना आईस पॅक किंवा बर्फाने शेक देणे हा आणखी एक सोपा उपाय आहे.