Join us   

दही खायला खूप आवडतं? वजनवाढ, ॲसिडीटीचे त्रास होण्याआधीच सावध व्हा, पाहा दही कसं-कधी खावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2024 4:36 PM

Side effects of having curd diet tips : दह्याचे दुष्परीणाम आणि ते खाण्याचे नियम याविषयी...

दही ही अनेकांच्या आवडीची गोष्ट, पोळी, भात, थालिपीठ किंवा अगदी कोणत्या पदार्थासोबत दही खाणारे आपल्या आजुबाजूला असतात. कधी साखर घालून तर कधी मीठ घालून हे दही खाल्ले जाते. कोशिंबीर, चटणी यातही दही घालून खाल्ले जाते. लहान मुलंही अगदी आवडीने दही खातात. दही हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे तसेच त्यातील घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे जरी खरे असले तरी दही खाण्याचे काही दुष्परीणामही आहेत. दह्याने पचनक्रिया सुधारते, एनर्जी मिळण्यास मदत होते हे खरे असले तरी सतत दही खाणे आरोग्यासाठी तितके फायदेशीर नाही. कारण दह्यातील काही गोष्टींमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या कोणत्या आणि दही खायचेच असेल तर कसे खावे याविषयी (Side effects of having curd diet tips)...

१. बद्धकोष्ठता

ज्यांचा कोठा जड असतो आणि पचनशक्ती क्षीण असते अशांनी दही खाल्ले तर पचनक्रिया मंदावण्याची शक्यता असते. तसेच जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात.

२. ॲसिडीटी

दही योग्य वेळी खाल्ले नाही तर ॲसिडीटी होऊ शकते. रात्रीच्या वेळी दही खाणे आरोग्यासाठी चांगले नसते, त्याने ॲसिडीटीची समस्या उद्भवते. 

(Image : Google)

३. सांधेदुखी

दह्यामध्ये जे प्रोटीन असते त्यामुळे अंगावर सूज येण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

४. ॲलर्जी

दुधाच्या पदार्थांमुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते. दही हाही दुधाचाच पदार्थ असल्याने काहींना खाज येणे, आग होणे, सूज येणे असे त्रास होऊ शकतात. 

५. सर्दी-कफ

दही हे थंड प्रकृतीचे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला आधीपासून सर्दी-कफ किंवा खोकला असेल तर ते वाढू शकते. 

६. वजनवाढ

एकावेळी खूप जास्त दही खाल्ले तर वजनवाढीसारखी समस्याही होऊ शकते. त्यामुळे दही हे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे केव्हाही चांगले. 

७. रक्तदाब

विकतचे दही प्रोसेस केलेले असल्याने त्यामध्ये सोडीयम असण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात सोडीयम शरीरात गेले तर रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.  

दही खायचेच असेल तर...

१. खूप आंबट झालेले फ्रिजमध्ये गार केलेले दही खाऊ नये, आधमोरं म्हणजेच ताजं दही खाणे केव्हाही जास्त चांगले.

२. दह्यामध्ये साखर किंवा मीठ घालून खाऊ नये. त्यापेक्षा दही नुसते खायला हवे.

३. दह्यापेक्षा ताक पिणे आरोग्यासाठी अधिक चांगले असते, त्याचा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे दह्याचे ताक करावे. 

४. दही साधारणपणे सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खावे. सूर्यास्तानंतर दही खाणे टाळावे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना