Join us   

आवडतात म्हणून खूप द्राक्षं खाता? तज्ज्ञ सांगतात, जास्त द्राक्ष खाण्याचे ३ साईड इफेक्ट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 11:17 AM

Side Effects Of Having Too Much Grapes : आवडते म्हणून एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.

बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्षं आली आहेत. आंबट गोड द्राक्षं अनेकांना आवडतात. उन्हाळ्याच्या दिवसांत ही द्राक्षं खाल्ल्याने सी व्हिटॅमिन, खनिजे मिळतात आणि शरीरात पाण्याची पातळी टिकून राहण्यासही मदत होते. ज्या त्या सिझनमध्ये जी ती फळं आवर्जून खायला हवीत असं आपण नेहमी ऐकतो. हे खरं असलं तरी ती फळं किती प्रमाणात, कशी खायची याचेही काही नियम असतात. उन्हातून आल्यावर आपल्यासमोर द्राक्षं असतील तर आपण सहज ती तोंडात टाकतो. लहान मुलंही अनेकदा आवडतात म्हणून येता जाता द्राक्षं खातात. आवडते म्हणून एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. द्राक्षं खाण्याने आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे यांनी काही महत्त्वाची माहिती दिली (Side Effects Of Having Too Much Grapes). 

१. डायबिटीस आणि लठ्ठपणा असेल तर

डायबिटीस आणि लठ्ठपणा असणाऱ्यांनी द्राक्षं कमी प्रमाणात खावीत. कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते. शुगर असणाऱ्यांनी द्राक्षं जास्त खाल्ली तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. साखरेची पातळी वाढणे धोक्याचे असल्याने डायबिटीस असलेल्यांनी द्राक्षं ठराविक प्रमाणातच खायला हवीत. मधुमेह आणि लठ्ठपणा या एकमेकांशी निगडीत समस्या असल्याने लठ्ठ व्यक्तींनीही योग्य प्रमाणातच द्राक्षं खावीत.

(Image : Google)

२. किटकनाशके

भाज्या, फळे यांना कीड लागू नये किंवा ते जास्त काळ टिकावीत यासाठी शेतकरी त्यावर मोठ्या प्रमाणात किटकनाशके फवारतात. यामुळे फळं जास्त काळ टिकण्यास मदत होते. पण ही किटकनाशके मात्र आरोग्यासाठी घातक असतात. द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात किटकनाशके असल्याने द्राक्षे स्वच्छ धुवून खायला हवीत. अन्यथा जुलाब, उलट्या यांसारखे त्रास होण्याची शक्यता असते. 

३. घशाच्या तक्रारी 

द्राक्षं काही वेळा आंबट असण्याची शक्यता असते. अशी आंबट द्राक्षं जास्त प्रमाणात खाल्ल्याने घसा धरण्याची शक्यता असते. यामुळे काहीवेळा खोकला, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवू शकतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स