Join us   

फूडी-फूडी म्हणत खा खा खाल्याने वजन तर भरमसाठ वाढेलच, छळतील ५ गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2023 2:10 PM

Side Effects of Over Eating : प्रमाणापेक्षा जास्त खाण्याने आरोग्यावर कोणते परीणाम होतात याविषयी...

खाणं ही अनेकांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. त्यांना खायला इतकं आवडतं की आवडीचा एखादा पदार्थ समोर आला की या व्यक्तींचा त्यांच्या तोंडावर अजिबात कंट्रोल राहत नाही. अशा लोकांना खाण्याच्या बाबतीत वेळेचेही भान नसते. त्यांच्या आवडीचा पदार्थ कोणत्याही वेळेला त्यांच्यासमोर आला की त्यावर ते इतके तुटून पडतात की त्यांना वेळेचेही भान राहत नाही. मी फूडी आहे असं म्हणत हे लोक समोर येईल त्या गोष्टीवर ताव मारत राहतात. त्यामुळे त्यांचे वजन तर वाढतेच पण त्याशिवायही या लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परीणाम होतो. एखादवेळी आवडलं म्हणून जास्त खाणं ठिक आहे, पण आपल्या बाबतीत नेहमीच असं होत असेल तर मात्र आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नसते. प्रमाणापेक्षा जास्त खाण्याने आरोग्यावर कोणते परीणाम होतात याविषयी (Side Effects of Over Eating)...

१. भूकेचे गणित चुकते

शरीराची भूक लागण्याची एक विशिष्ट क्रिया असते. त्यासाठी शरीरात २ प्रकारचे हॉर्मोन्स कार्यरत असतात. पण आपण जेव्हा एकावेळी खूप जास्त खातो तेव्हा भुकेचे हे गणित बिघडते. घ्रेलिन हा भूक लागण्यासाठी कारणीभूत असणारा हॉर्मोन आणि लेप्टीन हा भूक शमवणारा हॉर्मोन. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने या दोन्हीवर त्याचा परीणाम होतो. त्यामुळे आपल्या शरीराला नेमकी कधी आणि किती भूक आहे हे समजणे अवघड होते आणि आपण नकळत नेहमीपेक्षा जास्त खात राहतो. 

(Image : Google)

२. पचनाशी निगडीत समस्या 

आपण भूकेपेक्षा जास्त खातो तेव्हा पोटावर आणि आतड्यांवर त्याचा ताण पडतो. जास्त प्रमाणात खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्याचा शरीरावर ताण येतो. मग बद्धकोष्ठता, पोटाला सूज आल्यासारखे होणे, गॅसेस, पोटात दुखणे, अपचन अशा समस्या निर्माण होतात. यामुळे व्यक्ती हैराण होऊन जाते आणि शरीरावर एकप्रकारचा जडपणा आल्यासारखे होते. 

३. इन्शुलिन रेझिस्टन्स

जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्यांना इन्शुलिन रेझिस्टन्सची समस्या उद्भवते. त्यातही आहारात रिफाईंड शुगर, अनहेल्दी फॅटस यांचा समावेश असेल तर तर इन्शुलिन रेझिस्टन्सचे कारण निर्माण होते. याचाच अर्थ शरीर इन्शुलिनला कमी प्रमाणात प्रतिसाद देते आणि त्यामुळे टाइप २ डायबिटीस होण्याची शक्यता असते. 

४. थकवा आणि सुस्ती

आपल्याला नेहमीही खाल्ल्यानंतर एकप्रकारचा जडपणा येतो. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर ही सुस्ती जास्त प्रमाणात येते. जास्तीचे खाल्लेले पचवण्यासाठी शरीर पचनक्रियेसाठी जास्तीचे रक्त पाठवते ज्यामुळे आपल्याला थकवा आणि सुस्ती आल्यासारखे होते. 

(Image : Google)

५. हृदयाला धोका 

हृदयाच्या कार्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त खाणे अजिबातच चांगले नाही. जेव्हा आपण सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खातो तेव्हा कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढते. यामुळे हृदयाशी निगडीत समस्या आणि स्ट्रोकचा धोका असतो. त्यामुळे आपल्याला जेवढी भूक आहे तेवढेच खायला हवे.         

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल