आपल्या शरीराला विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आवश्यक असतात हे आपल्याला माहित आहे. ते मिळावेत यासाठी आपण आहारात विविध पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नाही तर आपण हे व्हिटॅमिन्स कमी पडू नयेत म्हणून आपण अनेकदा सप्लिमेंटस आणि गोळ्या-औषधेही घेतो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे करणे काहीवेळा घातक ठरु शकते. व्हिटॅमिन सी (Vitamin C ) शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहित आहे. यासाठी आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करायला हवा हेही आपण जाणतो. पण डाएटचे नियम आपल्याकडून म्हणावे तसे पाळले जात नाहीत. मग कोरोनासारखे साथीचे आजार आले की आपण मनानेच व्हिटॅमिन सीचे डोस घ्यायला सुरुवात करतो. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. पाहूयात सी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे साइड इफेक्टस (Side Effects of Vitamin C Supplements)...
१. अॅसिडीटी
जे लोक जास्त प्रमाणात सी व्हिटॅमिनची औषधे घेतात त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होत असल्याने त्यांना पोटाच्या समस्या निर्माण होतात. सी व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक तेवढेच अॅसिड असते, पण सी व्हिटॅमिनच्या औषधांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अॅसिड असल्याने त्याचा पोटाला त्रास होण्याची शक्यता असते. तसेच हा डोस तुम्ही किती प्रमाणात घेता यावरही तुमच्या तब्येतीचे गणित अवलंबून असते.
२. पचनाच्या समस्या
सी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा पचनावरही परिणाम होत असून यामुळे गॅसेस, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात. सुरुवातीला हा साईड इफेक्टस कमी प्रमाणात असले तरी सतत व्हिटॅमिन सी च्या गोळ्या घेत राहील्यास दिर्घकालाने त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.
३. त्वचेच्या तक्रारी
अनेकदा व्हिटॅमिन सी असलेली सौंदर्य उत्पादने वापरल्यावर आपली त्वचा चांगली होईल असे वाटल्याने व्हिटॅमिन सी असलेली उत्पादने महिलांकडून वापरली जातात. मात्र ही उत्पादने लावून लगेच उन्हात गेल्यास त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. अनेकदा यामुळे रॅशेस येणे, त्वचा लाल होणे अशा समस्या उद्भवतात. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने कोणाला अशाप्रकारची उत्पादने सूट होतात तर कोणाला नाही. त्यामुळे आधी कोणतेही वापरताना आधी पॅच टेस्ट घ्यायला हवी. किंवा या उत्पादनांपेक्षा गोळ्या किंवा सप्लिमेंटच्या स्वरुपात व्हिटॅमिन सी घेतलेले केव्हाही चांगले.
रोज किती व्हिटॅमिन सी घ्यायला हवे?
नॅशनल अॅकॅडमिक्सनुसार महिलांना रोज ७५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते. तर पुरुषांना ९० मिलीग्रॅम व्हिटॅमिन लागते. मात्र यावरही प्रत्येक देशात किंवा तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. असे असले तरी रोज व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन सी ची औषधे घ्यायला हवीत. अन्यथा हा डोस जास्त झाल्यास त्रास होऊ शकतो.